सातारा- पुण्याच्या लाल महालात लावणी सादर केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री वैष्णवी पाटील, मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. संभाजी ब्रिगेड संघटनेने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल रोजी लाल महालात आरोपी वैष्णवी पाटील व तीच्या सोबत असलेली एक स्त्री व दोन पुरुष असे लाल महाल येथे येऊन लाल महालाच्या आतील मोकळ्या जागेत वैष्णवी पाटील हिने लावणी नृत्य केले होते.
सदर प्रकरणानंतर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी थेट इशारा दिला आहे. खरं तर लाल महाल ही वास्तू नाच गाण्यांच्या चित्रीकरणाची जागा नाहीय. मात्र, या ठिकाणी कोणतेही ऐतिहासिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक प्रसंगाशी संबंधित चित्रीकरण करण्यास आमचा आक्षेप नाही. पण, या वास्तूचा इतिहास लक्षात घेवून चित्रीकरण करणं गरजेचं आहे. केवळ व्यावसायिक हेतूनं कोणी या वास्तूचा वापर करत असेल, तर आम्ही ते खपवून घेणार नाही. त्यामुळं संबंधित दोषींवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सध्या सगळीकडे ट्रेडिंग असलेल्या चंद्रा गाण्यावर संबंधित तरुणी डान्स करताना दिसून येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्या चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा या गाण्यावर एक तरुणी पुण्यातील लाल महालातील मध्यवर्ती ठिकाणी थिरकताना दिसत आहे. संबंधित तरुणी लावणीवर बेभान होऊन अदाकारी करताना दिसत आहे. पुण्यातील ऐतिहासिक लाल महालमध्ये लावणीचा व्हिडीओ शुट केल्यामुळे याचा विरोध म्हणून अनेक संघटना आता आक्रमक झाल्या आहेत.
वैष्णवी पाटीलने मागितली माफी-
या सगळ्या प्रकरणावर वैष्णवीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत जाहीर माफी मागितली आहे. या व्हिडिओमध्ये माफी मागत वैष्णवीने म्हणाली, 'पुण्याच्या लाल महालात व्हिडीओ शूट करताना माझ्या मनात कोणतेही वाईट विचार नव्हते. गाणं सुंदर असल्याने त्यावर व्हिडीओ करावा असे माझ्या मनात आले. त्यामुळे मी त्यावर मी व्हिडीओ शूट केला, असं वैष्णवी म्हणाली.
लाल महालात मी व्हिडीओ शूट केला ही माझ्याकडून चूक झाली आणि ती चूक मी मान्य करते. जितकेही शिवप्रेमी आहेत, जी जनता माझ्यावर प्रेम करते, माझ्या नृत्यावर प्रेम करते त्या सर्वांची मी माफी मागते, असा व्हिडीओ वैष्णवीने पोस्ट करत माफी मागितली आहे.