राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली होती. मराठा आरक्षणाच्या प्रश्नात कोणीही राजकारण आणू नये असे त्यांना सांगितले होते. कोणाच्या आरक्षणावर गदा देखील येऊ नये. इतर समाजातील नेत्यांना जसा न्याय मिळाला तसा मराठा समाजातील लोकांना देखील भेटायला हवा. शिवाजी महाराजांचा विचार जपायला हवा. नाहीतर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही, असे उदयनराजे म्हणाले. तसेच उद्या रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका बैठकीचे आयोजन केले आहे, त्याअनुषंगानेही चर्चा झाल्याचे ते म्हणाले.
खासदार उदयनराजे यांच्या मामेभावाच्या लग्नाची पत्रिका देण्याच्या उद्देशाने ते राजकीय नेत्यांची भेट घेऊन त्यांना लग्नाचे निमंत्रण देत आहेत. त्यानिमित्ताने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही नेत्यांची मते जाणून घेण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. उदयनराजे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली.
चौकट
उदयनराजेंकडून राजमुद्रा भेट
उदयनराजे भोसले यांनी कौटुंबिक लग्नसोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी राज यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज ठाकरे यांना राजमुद्रा भेट दिली. उदयनराजे हे पहिल्यांदाच ‘कृष्णकुंज’वर आल्याने राज यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचा सन्मान केला.