सातारा : 'तुम्हाला जे काही मिळाले आहे ते पहिल्यापासून ऐतं व काम न करता मिळालं आहे. जर सर्वसामान्य कुटुंबातील असता तर तुम्हाला लोकप्रतिनिधी देखील होता आलं नसतं,' अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर टीकास्त्र सोडले.सातारा नगरपालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीसाठी जिल्हा परिषदेसमोरील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या कामाची खासदार उदयनराजे यांनी आज, बुधवारी दुपारी पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आमदार शिवेंद्रसिंहराजेंवर नाव न घेता सडकून टीका केली.उदयनराजे म्हणाले, पूर्वीच्या लोकांनी चोऱ्यामाऱ्या केल्या, भ्रष्टाचार केला, डांबर चोरलं त्यामुळे आम्ही तुमच्या हातात सत्ता दिली आणि तुम्ही पण तसेच निघालात. बोलणं सोपं असतं पण करणं फार अवघड असतं. पोवई नाक्यावर ग्रेट सेपरेटर (भुयारी मार्ग) बांधताना इथे स्विमिंग पूल बांधणार की काय? अशी टीका आमच्यावर केली. अहो, जर इथे उड्डाणपूल बांधला असता आणि चुकून एखादे वाहन खाली कोसळले असते तर किती मोठी घटना घडली असती? ही बाब त्यांना समजू नये का. सर्व परिस्थितीचा आढावा घेऊनच ग्रेड सेपरेटरचे बांधकाम करण्यात आले.बांधकाम झाल्यानंतर याचे उद्घाटन आम्ही करणार असं ते म्हणाले. मी म्हणतो, उद्घाटन घ्यायचं होतं ना. असंही तुम्हाला सर्व काही ऐतं व काम न करताच मिळालेले आहे. तेव्हा घराण्यामुळे वीस वर्षे सत्ता यांच्याच हातात होती. हे जर सर्वसामान्य कुटुंबातील असते तर मला नाही वाटत ते कधी लोकप्रतिनिधी झाले असते.नूतन प्रशासकीय इमारत नऊ मजलीसातारा शहराची हद्दवाढ झाली असून, नगरपालिकेची सध्याची इमारत कामकाजासाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसमोरील दीड लाख स्क्वेअर फुट जागेत पालिकेची नूतन व सुसज्ज अशी नऊ मजली प्रशासकीय इमारत बांधली जात आहे. या इमारतीमधून निश्चितच शहराचे कामकाज अधिक प्रभावीपणे चालविले जाईल, असेही खा. उदयनराजे म्हणाले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर आदी उपस्थित होते.
..तर लोकप्रतिनिधीही नसता, उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजेंवर टीकास्त्र
By सचिन काकडे | Published: September 07, 2022 4:45 PM