लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांच्या बाबतीत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी गांभीर्याने विचार करतील, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. कोश्यारींच्या वक्तव्याच्या विरोधात खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
सुमारे २५ मिनिटांच्या या बैठकीत उदयनराजे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर आपली बाजू मांडली. या बैठकीचा तपशील खासदार उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल कोश्यारी यांच्यावर कारवाई करावी यासाठी महाराष्ट्रातील खासदारांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. कोश्यारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत सर्व खासदारांचे एकमत झाले आहे. राज्यपालांच्या विधानाची राष्ट्रपतींनी दखल घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र दिले आहे. मोदी याबाबत गांभीर्याने विचार करतील अशी अपेक्षा आहे. या विषयाकडे कृपया राजकारणाच्या नजरेतून पाहू नका.
कोश्यारींच्या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल. राज्यपालांनी केलेल्या विधानाला भाजप जबाबदार नाही. मात्र, राज्यपाल इतके काही घडूनही माफी मागत नाही, याची खंत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"