कऱ्हाड : येथील शिक्षण मंडळाला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याचे आवाहन शताब्दीपूर्ती सोहळ्यात करतानाच त्याची सुरुवात स्वत:पासून करीत खासदार श्रीनिवास पाटील यांनी संस्थेस एक लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यानुसार या जाहीर रकमेचा धनादेश त्यांनी नुकताच शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी व सचिव चंद्रशेखर देशपांडे यांच्याकडे सुपूर्द केला
१ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन झालेल्या शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलचा शताब्दीपूर्ती सोहळा गत महिन्यात संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना खासदार श्रीनिवास पाटील यांनी संस्थेविषयीच्या अनेक आठवणी जागवल्या. त्यांचे वडील दिवंगत दादासाहेब रामचंद्र पाटील हे टिळक हायस्कूलचे माजी विद्यार्थी होते. घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे मारूल ते कऱ्हाड हे अंतर चालून ते शाळेत यायचे. सोमवार ते शनिवार शाळा पूर्ण करून ते मारूलला जाऊन शेतीची कामे करायचे. एक वर्ष शेतात काही पिकले नव्हते. शाळेची फी देण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे शिक्षणात खंड पडण्याची शक्यता निर्माण झाली. त्यावेळी शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक दत्तोपंत पांडुरंग पाठक यांनी ती फी भरून त्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नव्हता. शाळेच्या या ऋणाबद्दल खासदार श्रीनिवास पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त करतानाच संस्थेला स्वयंपूर्ण बनवण्याचे आवाहन केले होते.
फोटो :
कॅप्शन : कऱ्हाड येथील शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी व सचिव चंद्रशेखर देशपांडे यांच्याकडे खासदार श्रीनिवास पाटील यांनी मदतीचा धनादेश दिला.