कोरोना कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावणाऱ्या कंत्राटी बीएएमएस अर्हताधारक डॉक्टरांना सेवामुक्त करण्यात आले आहे. त्याबाबतचे आदेश बहुतांश डॉक्टरांना प्राप्त झाले आहेत. मात्र, कंत्राटी डॉक्टरांना सेवामुक्त करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगून, तदर्थ वैद्यकीय अधिकारी संघटनेने पुनर्नियुक्तीची मागणी करीत लढा सुरू केला आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांनीही याची दखल घेत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी चर्चा केली.
तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता दरमहा नियमित मानधन मिळत नसतानाही जनतेला आरोग्य सेवा देण्यात मोलाची कामगिरी केलेली आहे. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन व तिसऱ्या कोरोना लाटेचा सामना करण्यासाठी या तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा उपयोग करून घेता येईल. त्यामुळे त्यांना कार्यमुक्त न करता पुन्हा सेवेत सामावून घेण्यात यावे, असे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितले. मात्र, बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याने तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी पदे उपलब्ध नाहीत, असे जिल्हाधिकारी सिंह यांनी स्पष्ट केले. अखेर तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ‘वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य सेवा गट ‘ब’ अशी नवीन पदनिर्मिती करून कायमचा प्रश्न सोडविण्याचे निर्देश खासदार पाटील यांनी दिले असून, हा प्रश्न नियोजन मंडळामध्ये उपस्थित करून आरोग्यमंत्र्यांकडे शिफारस करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
- चौकट
‘तो’ आदेश अद्याप मिळाला नाही!
आरोग्यमंत्र्यांनी बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी नेमणूक देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त झालेल्या जागांवर तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्काळ पुन्हा रुजू करून घेण्यात यावे, असे आदेश दिल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. मंगेश खबाले यांनी यावेळी सांगितले. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयास तसा लेखी आदेश मिळाला नसल्याने अशी कार्यवाही करता येत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
फोटो : २५केआरडी०१
कॅप्शन : सातारा येथे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना खासदार श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. मंगेश खबाले, शेखर गोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. सी. गौडा उपस्थित होते.
.......................................................