फलटण : ‘फलटणचे राजघराणे हे जातपात न मानणारे असून, आमचे आजोबा मालोजीराजे हे प्रगल्भ विचारांचे होते. आमच्या आई-वडिलांच्या लग्नाचा पुरावा घेऊन कुठे येऊ, आपले हजार रुपये तयार ठेवा. अपघाताने निवडून आलेल्या खासदारांनी डीएनएची तर भाषाच करू नये. त्यांच्या ती अंगलट येईल,’ असे आव्हान विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.कोळकी येथील अनंत मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात रामराजे बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, नगराध्यक्षा नीता नेवसे, पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा धुमाळ, नगरसेविका सुभद्र्राराजे नाईक-निंबाळकर, फलटण शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष मिलिंद नेवसे आदी उपस्थित होते.रामराजे म्हणाले, ‘आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कोणीच गावाच्या हिताचे सार्वजनिक कामे घेऊन येत नाही, ही माझी खंत आहे. या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी किती कामे केली, याचा विचार करण्याची गरज आहे. खरंतर अहंकार सोडून आपणाला राजकारण करावे लागेल. गावागावातील असणारे दोन गट एकत्र करूनच आपणाला काम करावे लागेल, ती जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागेल.’‘आमची शिव्या देण्याची संस्कृती नाही. अपघाताने निवडून आलेल्या खासदारांनी आमच्यावर खालच्या पातळीवर बोलून आपली संस्कृती फलटणकरांना दाखवून दिली आहे. भविष्यात आपणाला याची जरूर किंमत मोजावी लागेल. आपल्या कार्यकर्त्यांनी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, याची पूर्ण जबाबदारी आमची आहे. अपघाताने निवडून आलेल्या खासदारांनी डीएनएची तर भाषाच करू नये. त्यांच्या ती अंगलट येईल. तुमचा आणि तुमच्या घराण्याचा काय इतिहास आहे, हे सर्वांना माहिती आहे. ते घरातल्यावरही हात टाकतात, शेवटी वळणावरचे पाणी वळणावरच जाणार आहे. यांच्या घराण्याबद्दल बोलायला ढीगभर आहे; पण मी बोलणार नाही, ही आमची संस्कृती नाही. २५ वर्षांत मला कोणी शिवी दिली नाही. मात्र रणजितसिंहांना कधीच माफ करणार नाही,’ असा इशारा रामराजे यांनी दिला.त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो : संजीवराजेसंजीवराजे म्हणाले, ‘रणजितसिंह हे अपघाताने झालेले खासदार आहेत. आपण केलेली ही चूक आता पाच वर्षे आपणाला भोगावी लागेल. निवडून आलेल्या खासदारांनी रामराजे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करून आपली संस्कृतीच दाखविली आहे. आम्हालाही ठोशास ठोसा देता येतो. आम्हीसुद्धा आपणाला याच भाषेत उत्तर देऊ शकतो; परंतु आमच्यावर मालोजीराजे यांचे संस्कार झाले आहेत.’
खासदारांनी डीएनएची भाषा करू नये : रामराजे नाईक-निंबाळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 11:24 PM