सातारा : दोन महिन्यांपूर्वी भाजपला नावं ठेवणारे माणचे आमदार स्वत:वरील गुन्ह्यातून वाचावं म्हणून सध्या धडपड करत आहेत, अशी टीका करतानाच माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी भाजपचे नूतन खासदार मित्रप्रेम म्हणून बदनाम, किंमत नसणाऱ्यांना घेऊन फिरत आहेत. खासदारांनी आता हे बदलेलं वागणं थांबवायला हवं, असा सल्लाही रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दिला.येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे माण आणि खटाव तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते. माजी आमदार डॉ. येळगावकर म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघात तिसरी आघाडी झाली होती. त्यातून संजय शिंदे यांनी काढता पाय घेतल्याने आघाडीला भवितव्य नसल्याचे दिसून आले. त्यामुळे माणच्या आमदारांनी पळवाट शोधली.
त्यांच्यावर खंडणी तसेच इतर अनेक गुन्हे नोंद आहेत. त्यातून वाचण्यासाठी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. पण, आमदारांची खटाव तालुक्यातील संघटना पूर्णपणे विस्कळीत झालीय. त्यांनी केलेले माण आणि खटावचे काँग्रेसचे अध्यक्षही त्यांच्याकडे राहिले नाहीत. राजकारणातील त्यांचा हा शेवटचा खटाटोप आहे.खºया अर्थाने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना आणण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न केले. माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत परिचारक यांचेही योगदान आहे. पण, आमदार गोरे म्हणतात मीच सर्व केलं.
माण विधानसभा मतदारसंघात खटाव तालुक्यातील जिल्हा परिषदेचे तीन गट व एक नगरपंचायत असतानाही खटावने १० हजार ४४१ चं रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना मताधिक्य दिले. तर माणमध्ये संपूर्ण तालुका असताना व आमदारांसह शेखर गोरे असूनही भाजपला केवळ १२ हजार ७७४ चं मताधिक्य मिळालं.
आंधळी, बिदाल जिल्हा परिषद गटातही राष्ट्रवादी भाजप उमेदवाराच्या थोडी मागे आहे. म्हसवड पालिका शेखर गोरे यांच्याकडे, दहिवडी नगरपंचायत आमदारांकडे मग मते कोठे गेली ? असा सवालही डॉ. येळगावकर यांनी केला.आमदारांनी शेती व पाण्याचा एकही नवा प्रकल्प आणला नाही. सतत उरमोडी योजनेचे पाणी नाचवायचे असे सांगून डॉ. येळगावकर पुढे म्हणाले, माणच्या क्रीडा संकुलाची जागा ताब्यात नाही. त्यांच्या कामाचा पर्दाफाश हा कामानेच करणार आहे.
एक टेलरमेड नेता म्हणून त्यांचे काम सुरु आहे. निवडणुकीच्या शेवटच्या तीन दिवसांत तर आमदारांनीच सर्व यंत्रणा हायजॅक केलेली. आम्हाला पोलींग एजंटचा फॉर्मही दिला नाही. मतदारांसाठी वाहन व्यवस्था नव्हती. पण, आम्ही ही सर्व यंत्रणा उभी केली.हे बरोबर नाही...माण तालुक्यातील दुष्काळ दौरा नूतन खासदार सोमवारी करणार होते. त्याचे नियोजन अगोदरच झाले. पण, आम्हाला फोन सकाळी येतो. खासदारांचं वागणं आता बदलायला लागलंय. त्यांनी तसं करु नये असं आम्हाला वाटतं. कारण, भाजप पक्षानं भल्याभल्यांना घरी बसवलंय. काल कार्यक्रम ठरवता अन् आज आम्हाला सांगता हे बरोबर नाही, असा इशारा वजा सल्लाही डॉ. येळगावकरांनी यावेळी दिला.