सातारा : कधी कोविड तर कधी मराठा आरक्षणाचे कारण सांगून राज्य आयोगाने स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्या. विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केल्यानंतर २१ मार्चला ही परीक्षा घेतली, पण त्याचा निकाल अद्यापही लागला नाही. राज्याचे प्रशासन चालविण्यासाठी सक्षम हात मिळूवन देण्यासाठी आयोगाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थी गोंधळात आणि पालक चिंतेत पडले आहेत.
महाष्ट्र राज्य आयोगाच्या स्पर्धांमध्ये यश मिळवून प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न बघणाऱ्या तरुणाईला आता बेरोजगारी आणि नैराश्याने ग्रासले आहे. दोन वर्षांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक पदाची मुख्य परीक्षा पास झाली. मात्र त्यांची शारीरिक चाचणी व मुलाखत घेतली जात नाही. राजपत्रित अधिकाऱ्यांच्या जागांवर निवड झालेल्या उमेदवारांना तीन वर्षांत अद्यापही नियुक्ती दिलेली नाही. राज्य लोकसेवा आयोगाच्या या गोंधळाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर नक्कीच होत आहे. दोन वर्षांत एकही नवीन जाहिरात नाही आणि संयुक्त पूर्वपरीक्षा पाच वेळा पुढे ढकलली गेली आहे. परिणामी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाप्रमाणे राज्य आयोगाने वेळापत्रक राबवावे, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांची आहे. आयोगाचे बिघडलेले वेळापत्रक पूर्वपदावर कधी येणार याकडे विद्यार्थी डोळे लावून बसले आहेत.
चौकट
क्लासचालकही अडचणीत
लॉकडाऊनमुळे शासनाने सुमारे दीड वर्षे आम्हाला क्लास सुरू करायला परवानगी दिली नाही. आॅनलाइन क्लासला विद्यार्थ्यांकडून म्हणावा असा प्रतिसाद मिळत नाही. खाजगी क्लासच्या शिक्षकांवर सध्या बेरोजगारीची स्थिती आहे. सर्व देणी भागवेपर्यंत क्लासचालक कर्जबाजारी झाले आहेत. बाकडी विकून उधारी भागवा असं लोक म्हणतात.
- अभिजित निकम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक
शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांप्रमाणे सरकारने स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना गृहीत धरले. कोरोनाचे कारण सांगून क्लास बंद केला, पण यामुळे विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षा देण्याचे वय निघून गेल्याचे लक्षात आले नाही. उत्तम शिक्षक टिकविण्यासाठी प्रसंगी पत्नीचे दागिने मोडून आम्ही शिक्षकांचे पगार केले.
- कृष्णात सावंत, स्पर्धा केंद्र चालक
स्पर्धा परीक्षा देण्याची ऊर्मी असलेल्या अनेकांना आता वयाच्या अटीची धास्ती आहे. त्यात आॅनलाईन वर्गांची सवय नसल्याने अभ्यास काय शिकवला जातोय हे समजत नाही. अडीच वर्षांपासून परीक्षा न झाल्याने नुसतीच तयारी सुरू असल्याने आता वैताग आला आहे.
-
कोरोनाकाळात मोर्चे, आंदोलन, निवडणुका यांवर प्रशासनाने बंधने आणली नाहीत. पण आमच्यावर परीक्षेची अनिश्चितता लादली गेली. वाढते वय आणि हातातून निसटून जाणारी संधी या द्वंद्वात मनोबल वाढविणे जिकिरीचे होत आहे. चौकशीसाठी नातेवाइकांची भर अधिक त्रासदायक ठरते.
- ओंकार जगदाळे, विद्यार्थी
पॉर्इंटर
कोरोनामुळे मागील दीड वर्षांहून अधिक काळापासून आॅफलाईन क्लास घेण्यासाठी शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे आॅनलाईन क्लास घेतले जातात. यापुढे आणखी किती दिवस हे असंच चालणार याची कालमर्यादा कोणालाच ज्ञात नाही.
आॅनलाईन वर्गांचा पर्याय खुला असला तरीही संकल्पना स्पष्ट होण्यासाठी या क्लासला मर्यादा आहेत. त्यामुळे आॅनलाईन क्लासेसला फारसा प्रतिसाद मिळत नाही.
आॅनलाईन वर्ग सुरू असल्यामुळे नित्यनियमाने क्लास सुरू राहतो. यामुळे मूठभर विद्यार्थी शिकत असल्यामुळे क्लासचे अस्तित्व टिकून राहते.
चौकट :
यंदाच्या परीक्षांच्या तारखा अनिश्चितच
कोविडमुळे यंदा परीक्षा होईल की नाही, ते निश्चितपणे कोणीही सांगू शकत नाही. मागील अडीच वर्षांपासून राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक बिघडले आहे. राज्य लोकसेवा आयोगाकडे परीक्षा घेण्याचे नियोजन नाही.
परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी गोंधळात पडले आहेत, अनेक विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत सापडले आहेत. स्पर्धा परीक्षांंची तयारी करणाऱ्या पुण्याच्या तरुणाने आत्महत्या केल्याने पालकांच्याही चिंतेत भर पडली आहे.