औंध : ‘महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकासह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री यमाई देवीचा वार्षिक रथोत्सव दि. २५ रोजी होणार असून, रथोत्सवानंतर दहा दिवस भरणाऱ्या यात्रेमध्ये यात्रेकरू, भाविक, व्यापारी यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणार आहे,’ अशी माहिती श्री यमाई देवस्थानच्या मुख्य विश्वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दिली.औंध येथील ग्रामनिवासिनी श्री यमाई देवी मंदिराच्या सभा मंडपात रथोत्सव व यात्रा नियोजनासंदर्भात त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच रोहिणी थोरात, उपसरपंच बापूसाहेब कुंभार, हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने, मधुरा टोणे, सहायक पोलीस निरीक्षक उदय देसाई, रमेश जगदाळे, सचिन शिंदे, चंद्रकांत कुंभार, इलियाज पटवेकरी, अब्बास आतार, दीपक नलवडे, वसंत जानकर, वसंत माने, शंकरराव खैरमोडे, सोमनाथ यादव उपस्थित होते. हणमंतराव शिंदे म्हणाले, ‘पंचांग तिथीनुसार यंदा रविवार, दि. २४ रोजी सायंकाळी ७ वाजता श्री यमाई देवीचा दीपोत्सव, छबिनोत्सव साजरा केला जाणार आहे. सोमवार, दि. २५ रोजी रथोत्सव सोहळा होणार आहे.’यंदाच्या रथोत्सव सोहळ्यासाठी माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार, विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. प्रभाकर घार्गे, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, सुंदरगिरी महाराज उपस्थित राहणार आहेत. रथोत्सवानंतर श्री यमाई देवीची भव्य यात्रा ७ फेब्रुवारीअखेर भरविली जाणार आहे. यात्रेनिमित्त येणाऱ्या व्यापाऱ्यांना, व्यावसायिकांना सर्व सुविधा देण्यात येणार आहेत. जागा वाटपाची विशेष काळजी औंध ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात येणार आहे. सहायक पोलीस निरीक्षक देसाई यांनी यात्रेत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. (वार्ताहर)
श्री यमाईदेवीचा रथोत्सव २५ जानेवारीला
By admin | Published: January 14, 2016 11:44 PM