उंब्रज
ग्रामपंचायतीच्या थकीत वीजबिलाच्या कारणावरून विद्युत वीज वितरण कंपनीने सोमवारी गावातील विद्युतपुरवठा बंद केला. यामुळे उंब्रज ग्रामपंचायतीने तातडीने निर्णय घेत विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या गेटला टाळे ठोकून जेसीबीने चर मारून तेथील विद्युत वितरण कंपनीचे नळ कनेक्शन बंद केले. या प्रकारामुळे रात्री उशिरापर्यंत उंब्रज येथील स्ट्रीट लाइटसह घरगुती वीजही गायब होती. दरम्यान, यावर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व वीज वितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये यावरून रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. या सर्व प्रकाराने ग्रामस्थांना मात्र अंधारात राहावे लागले.
याबाबत अधिक माहिती अशी की, उंब्रज ग्रामपंचायतीच्या रस्त्यावरील लाईटच्या बिलाची रक्कम थकीत आहे. तसेच वीज वितरण कंपनीच्या येथील कार्यालयाकडून अनेक वर्षांपासूनची ग्रामपंचायतीची पाणीपट्टी व घरपट्टी ही थकीत आहे. असे असताना आज पूर्वसूचना न देता विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी उंब्रज गावातील स्ट्रीट लाईट बंद केली. त्यानंतर ग्रामपंचायतीने आक्रमक पवित्रा घेत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साह्याने वीज वितरणच्या गेट समोर चर मारून गेटला कुलूप मारले. तसेच नळ कनेक्शन बंद केले. त्यानंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकारी यांनी गावातील घरगुती वीज बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण होऊन ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांबरोबरच ग्रामस्थ यांनी वीज वितरण कार्यालयासमोर धाव घेतली. या वेळी अधिकारी व ग्रामस्थ ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यामध्ये चर्चा होऊन यासंदर्भात तोडगा काढण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. मात्र, रात्री उशिरापर्यंत उंब्रज येथील वीज गायब होती. स्ट्रीट लाईटबरोबर गावातील घरगुती लाईटही बंद करण्यात आल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. ग्रामस्थांना रात्री उशिरापर्यंत अंधारात राहावे लागले. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत वीज वितरण कार्यालयाबाहेर वीज अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात या अनुषंगाने चर्चा सुरू होती.
===Photopath===
280621\img_20210628_185504.jpg
===Caption===
विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर गेट ला कुलुप लावून चर काढण्यात आली.यानंतर चर्चा करताना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी