वाई : वाई तालुक्यातील सर्व ११७ गावांमधील पथदिव्यांचे कनेक्शन गुरुवार, दि. १६ रोजीपासून महावितरणकडून तोडण्यात आले आहे. ग्रामपंचायतींचे लाखोंचे बिल थकल्याने महावितरणकडून ही कारवाई करण्यात आली आहे. परंतु ग्रामपंचायतीचे वीजबिल भरण्याची जबाबदारी ही पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची असून, त्यांनी ते वेळेत न भरल्याने वाई तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भाग अंधारात आहे, तर गावांतील सर्व पाण्याच्या योजना बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.वाई पंचायत समितीकडून वेळेत लाईट बिल भरले गेले नसल्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पंचायत समिती व महावितरणच्या विरोधात आरपीआय, मराठा आघाडी आक्रमक झाली असून, ११७ ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ सोमवार, दि. २० रोजी धडक मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारणार आहे, त्या अनुषंगाने शुक्रवार, दि. १७ रोजी वाई शासकीय विश्रामग्रहात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातील पदाधिकाऱ्यांची व ग्रामस्थांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सर्वानुमते वाई येथून पंचायत समितीपर्यंत महामोर्चाचे आयोजन केले असून, महावितरणचा झटका बसलेल्या सर्व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन संबंधितांकडून करण्यात आले आहे. हा मोर्चा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मराठा आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीनिवास घाडगे, उपाध्यक्ष युवक आघाडी महाराष्ट्र स्वप्निल गायकवाड, मराठा आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनील मांढरे, वाई तालुकाध्यक्ष श्रीकांत निकाळजे, संतोष गायकवाड, काली घाडगे, रुपेश मिसाळ, किरण घाडगे, अनिल सणस, बाजीगर इनामदार, विशाल शिंदे, उमेश गाडे, नीलेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोर्चात ग्रामपंचायतींना सहभागी होण्याचे आवाहन...
वाई तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीचा जमा होणारा महसूल तुटपुंजा आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेची जबाबदारी असल्यामुळे ग्रामपंचायतील वीजबिल भरणे शक्य नाही, सध्या तालुक्यातील सर्व गावे अंधारात आहेत. तरी या समस्यांविषयी आवाज उठविण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतीने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आरपीआय, मराठा आघाडीच्यावतीने करण्यात आले आहे.