रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरात गेल्या दहा दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने महावितरणचे सुमारे आठ लाखांचे नुकसान झाले. तुटलेल्या व पडलेल्या पस्तीस वीज खांबावरील वीजवाहिन्या दुरुस्त करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे. दरम्यान, साप येथील काही भाग अद्याप अंधारातच आहे.
गेल्या दहा दिवसांपूर्वी रहिमतपूर शहरासह परिसरातील साप, अपशिंगे व अंभेरी येथे सुमारे तासभर झालेल्या वादळी पावसामुळे सुमारे पस्तीस वीज खांब जमीनदोस्त झाले होते. त्यामुळे तेथील सगळा परिसर अंधारात गेला होता. दोन दिवसानंतर घरगुती वीज पुरवठा सुरळीत झाला. मात्र, शेतातील अनेक लहान-लहान वस्त्या व विंधन विहिरीचा विद्युत पुरवठा बंद होता. गेल्या दहा दिवसांपासून रहिमतपूर वीज उप केंद्र्रातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे चाळीस वीज कर्मचारी तुटलेले खांब व तुटलेल्या वीजवाहिन्या जोडण्याच्या कामात गुंतले आहेत. मात्र अनेक खांबावर झाडे पडून खांबमधूनच तुटल्यामुळे वीज जोडणीस अडचणी येत होत्या. बहुतांशी तुटलेले खांब व तुटलेल्या वीज वाहिन्या जोडण्यात आल्या आहेत.
अद्याप राहिलेल्या विद्युत वाहिन्या व वीजखांब उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वादळी पावसामुळे महावितरणचे सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत विंधन विहिरीसह वस्त्यांवरील वीजपुरवठा नियमितपणे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती रहिमतपूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता वैभव थोरवडे व रहिमतपूर शहर शाखा सहायक अभियंता युवराज वाघ यांनी माहिती दिली.