दत्ता यादव ।सातारा : विजेचे वाढते दर आणि सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा, यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सौरऊर्जेचा प्रकल्प तालुक्यातील प्रत्येक एका शाळेत हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्वत:ला वीज वापरून झाल्यानंतर उर्वरित राहिलेली वीज चक्क वीज कंपनीलाच विकली जाणार आहे.
विजेची बचत, महत्त्व आणि त्याचा वापर मुलांना लहान वयातच समजावा, तसेच वाढत्या वीजदरांमुळे झेडपीचे होत असलेले आर्थिक नुकसान कमी होऊन आपण स्वावलंबी व्हावे, हा संदेश मुलांमध्ये रुजविण्यासाठी शाळांमध्ये सौरऊर्जा प्रकल्पाचा संकल्प पुढे आला. सर्व शाळांचे डिजिटललायजेशन झाल्यामुळे सर्व कामे आॅनलाईन पद्धतीने झालीआहेत. त्यामुळे शाळांमध्ये विजेचा वापर जास्त प्रमाणात होत असतो. हा खर्चही कमी व्हावा, हा उद्देशही या प्रकल्प मागचा आहे. सध्या प्रत्येक शाळेमध्ये महिन्याकाठी सरासरी २२ युनिट वीज खर्च होत असते.
शाळांना अडीच ते पाच हजारांपर्यंत वीज बिल येते. त्यामुळे या सौरऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून महिन्याला १ किलो व्हॅट इतकी वीज तयार होणार आहे. एवढ्या विजेचा कितीही वापर केला तरी ही वीज उरणार आहे. ही उरलेली वीज इतर कोणाला न देता ती वीज वितरण कंपनीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिन्याला एमएसईबीकडून येणारे वीज बिल यातून वळीत केले जाणार असून, शाळांना महिन्याकाठी येणारा पाच हजारांचा खर्च पूर्णपणे वाचणार आहे. एवढेच नव्हे तर वर्षाला पाच लाखांची बचतही होणार आहे.
तालुक्यातील प्रत्येक एका शाळेत सौरऊर्जेचा प्रकल्प राबविण्यात येत असून, या माध्यमातून मोठी आर्थिक बचतही होणार आहे.- पुनिता गुरव,प्राथमिक शिक्षणाधिकारी