लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींची करवसुली होत नाही. अशा स्थितीत पथदिवे आणि सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनांची वीजजोडणी महावितरण कंपनीने तोडू नये, अशी मागणी सदस्यांनी कृषी समिती सभेत केली. तर याबाबतचा ठराव करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा, अशी सूचना सभापती मंगेश धुमाळ यांनी केली.
सातारा जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची मासिक सभा सभापती मंगेश धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेस जिल्हा कृषी विकास अधिकारी विनायक पवार, समितीचे सदस्य प्रतीक कदम, प्रकाश चव्हाण, सुरेखा जाधव, शंकर खबाले-पाटील आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात सव्वा वर्षापासून कोरोनाचे संकट आहे. या संकटाने ग्रामपंचायतींच्या करवसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत वीजबिल थकबाकीपोटी महावितरणने पथदिवे आणि नळ पाणीपुरवठा योजनांची वीजजोडणी तोडण्याचा प्रकार सुरू केला आहे. याबाबत सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. तर सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची वीज कनेक्शन तोडणे योग्य नाही. याबाबत सदस्यांच्या भावना तीव्र असणे साहजिकच आहे. यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करू, असे सभापती धुमाळ यांनी स्पष्ट केले.
खरीप हंगामात खते, बियाण्यांची टंचाई भासू नये यासाठी कृषी विभागाने पावले उचलली होती. त्यानुसार कोठेही टंचाई परिस्थिती निर्माण झाली नाही. कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचनाही सभापती मंगेश धुमाळ यांनी या वेळी केली. तर जिल्हा कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांनी कृषी विभागाचा आढावा सादर केला.
चौकट :
कृषी स्वावलंबन वीजजोडणी प्रलंबित...
कृषी स्वावलंबन योजनेची जिल्ह्यात १६८ वीजजोडण्या प्रलंबित आहेत. या जोडण्या तातडीने होण्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे. याबाबत लवकरच कार्यवाही सुरू होईल, अशी माहिती सभापती मंगेश धुमाळ यांनी दिली.
\\\\\\\\\\\\\\\\\\\\\