मलकापूर :
लॉकडाऊनमुळे महावितरणच्या मलकापूर विभागांतर्गत ६ गावांत २ कोटी ३२ लाख रुपये थकबाकी आहे. तर काही गावांच्या रस्त्यावरील लाईट व पाणी कनेक्शनची थकबाकीही १ कोटी ७० लाख रुपये आहे. या थकबाकी वसुलीचे महावितरण कंपनीपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. वसुलीसाठी कंपनीने ठोस कारवाईचा बडगा उचलला असून कनेक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत ६ गावांमधील सुमारे ६७० कनेक्शन बंद करून थकबाकीधारकांना चांगलाच झटका दिलेला आहे.
महावितरण कंपनीच्या मलकापूर सबस्टेशन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये मलकापूर, कोयना वसाहत, जखिणवाडी, नांदलापूर, कापिल, गोळेश्वर ही सहा गावे येतात. या उपकेंद्रांतून या सहा गावांत वीजपुरवठा करण्यात येतो. या विभागांमध्ये २२ हजार ग्राहकांची संख्या आहे. त्यापैकी ४ हजार ६७० ग्राहकांकडे २ कोटी ३२ लाख रुपयांची थकबाकी आहे. तसेच सुमारे ४ हजार ग्राहकांनी वीजबिल भरले नसून त्यांच्याकडे १ कोटी ७० लाख रुपयांची थकबाकी आहे. लवकरच या ४ हजार ग्राहकांवर कनेक्शन तोडण्याची कारवाई होणार आहे. घरगुती वीजवापर करणाऱ्या ग्राहकांसोबतच काही गावांतील रस्त्यावरील लाईटची ४१ कनेक्शन आहेत, तर १७ पाणी कनेक्शन आहेत. रस्त्यावरील लाईट व पाणी कनेक्शनचे १ कोटी ७० लाखांचे वीजबिल थकीत आहे. वीज वितरण कंपनीकडून ४१ रस्त्यावरील लाईटची कनेक्शन कट केल्याने अनेक गावांतील रस्त्यांवर सध्या अंधार आहे. सार्वजनिक पाणीपुरवठ्याची वीजबिले निम्म्याने भरल्यामुळे ती तोडण्यात आलेली नाहीत. १५ व्या वित्त आयोगातून गावांना जो निधी मिळत आहे, त्या निधीतून वीजबिल भरावे, असे आवाहन महावितरण कंपनीकडून त्या त्या ग्रामपंचायतींना करण्यात येत आहे.
चौकट
काही गावांतील रस्त्यांवर अंधार
सहा गावांतील ग्रामपंचायत रस्त्यावरील लाईटची ४१ कनेक्शन आहेत. लॉकडाऊनमुळे लाईट व पाणी कनेक्शनचे जवळजवळ १ कोटी ७० लाखांचे वीजबिल थकीत आहे. महावितरण कंपनीकडून ४१ स्ट्रीट लाईट कनेक्शन कट केल्याने अनेक गावांतील रस्त्यांवर सध्या अंधार आहे.