सातारा , दि. १९ : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी संपाचा प्रवाशांना नाहक त्रास होत असला तरी या संपाचा अनेकांनी चांगला फायदा उठविण्यास सुरूवात केली आहे. हौस म्हणून घेतलेल्या अलिशान कार अनेकांनी चक्क वडाप वाहतुकीसाठी बाहेर काढल्या आहेत.
एसटीच्या कर्मचाऱ्यानी सातवा वेतन आयोग मिळण्यासाठी बेमुदत संप पुकारला आहे. तीन दिवसांपासून सर्व एसटी बसस्थानकातच उभ्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. ऐन दिवाळीच्या धामधुमीमध्ये अनेकांना पै-पाहुण्यांकडेही जाता येईना.
संप मिटण्याची लक्षणे दिसत नसल्याने राज्य शासनाने अखेर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कार, स्कूल बस यासारख्या खासगी वाहनांना वाहतुकीची परवानगी दिली आहे. हीच संधी साधून अनेकांनी आपल्या अलिशान कारने वडाप वाहतूक सुरू केली आहे.
आठ सिटर आणि पाच सिटरच्या कारमधून पुणे, कोल्हापूर, कऱ्हाड असे वडाप केले जात आहे. पुण्याला ११५ रुपये तिकीट असताना हे कार चालक तब्बल ५०० रुपये प्रत्येकी घेत आहेत. रात्रीचा दर यापेक्षाही जास्त आहे.
८०० ते ९०० रुपयांपर्यंत मनात येईल तसे पैसे प्रवाशांकडून उकळले जात आहेत. अनेकांना तातडीने जाणे गरजेचे असल्याने असे लोक पैसे देण्यास मागे-पुढे पाहात नाहीत. अलिशान कारची सवारी यानिमित्ताने सर्वसामान्यांना अनुभवयास मिळत आहे.