संदीप कुंभार ।लोकमत न्यूज नेटवर्कमायणी : मुळीकवाडी, ता. खटाव येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेच्या दोन्ही खोल्यांची संपूर्ण रंगरंगोटी करून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तर शाळेतील भिंतीवर विज्ञान, गणित, भाषासारख्या पाठ्यक्रमातील उपक्रम रेखाटून शाळांच्या खोल्यांचा कायापालट केला आहे. यामुळे शाळेच्याभिंती बोलू लागल्या असून, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होताना दिसत आहे.याबाबत माहिती अशी की, खटाव तालुक्याच्या पूर्व-दक्षिण भागात डोंगर उतारावर असलेल्या मुळीकवाडी या सुमारे ६०० लोकसंख्येच्या गावात दोन शिक्षकी व दोन खोल्या असलेली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. यामध्ये पहिली व दुसरीचे विद्यार्थी एका वर्गात तर तिसरी व चौथीचे दुसऱ्या एका वर्गात शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी शाळेच्या सर्व भिंतीचे रंगकाम करण्यात आले आहे. या भिंतींवर पाठ्यपुस्तकातील कविता, पाढे, मुळाक्षर, जोडाक्षर, देशातील राज्यांचे, जिल्ह्याचे भौगोलिक नकाशे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द यासह विविध फळाफुलांची व पक्षांची नावे लिहिलेली आहेत.जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणाºया मुला-मुलींसाठी येथे स्वतंत्र स्वच्छतागृह असून, पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. यासह संपूर्ण शाळा परिसरामध्ये विविध जातींचे वृक्ष, फुलझाडे लावली आहेत. त्यामुळे संपूर्ण शाळा परिसराचे एक प्रकारे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाºया-जाणाºयांचे लक्ष शाळेकडे आकर्षित होत आहे.शाळा व परिसरामध्ये रंगकाम करून त्यावर करण्यात आलेले शालोपयोगी माहिती मुलांना सहज वाचायला मिळत आहे. तसेच येता-जाता नजरेत पडत असल्यामुळे मुलांच्या ज्ञानात दिवसेंदिवस भर पडत आहे. दरम्यान, मुळीकवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील या सोयीसाठी ग्रामस्थांनी सुमारे साडे तीन लाख रुपयांची मदत केली आहे. यामुळे शाळेचे रुपडे पालटल्याचे दिसून येत आहे.आर्थिक मदत...गावामध्ये असणारे व व्यवसायानिमित्त बाहेर असलेल्या लोकांनी शाळेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सुमारे ३ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. यामुळे या शाळेचे संपूर्ण नूतनीकरण करणे व शाळेच्या खोल्या डिजिटल करणे शक्य झाले आहे.
मुळीकवाडी शाळेच्या भिंती लागल्या बोलू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 12:00 AM