सातारा : सातारा शहरातील नटराज मंदिरासमोर झालेल्या तरुणाच्या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मुख्य सूत्रधारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस रेकॉर्डवर असणाऱ्या दोघांना मुंबईतून अटक करण्यात आली. हे दोघेही वाई शहरातीलच आहेत.
दि. २ जुलै रोजी दुपारी साडे तीनच्या सुमारास सातारा शहरातील नटराज मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोघांनी एका तरुणाचा पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला होता. मृत तरुणाचे नाव अर्जून मोहन यादव (वय २६, रा. वाई) असे होते. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. तर खुनानंतर पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर हे घटनास्थळी पोहोचले होते.
पोलीस अधीक्षकांनी माहिती घेतली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशार धुमाळ यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना केली होती. त्यानंतर धुमाळ यांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली पथक तयार केले. हे पथक आरोपींचा शोध घेत होते. या पथकाने ४ जुलै रोजी गुन्ह्यातील तिघां अल्पवयीन संशयितांना अटक केली. पण, मुख्य सूत्रधार व पोलीस रेकॉर्डवरील आरोपी अभिजित उर्फ भैया शिवाजी मोरे (रा. गंगापूरी, वाई) आणि सोमनाथ बंडू शिंदे (रा. रविवार पेठ, वाई) हे परागंदा झाले होते.
दरम्यान, शोध घेत असताना पथकाला अभिजित मोरे आणि सोमनाथ शिंदे हे मानखुर्द (मुंबई) येथे असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक गर्जे यांचे पथक मुंबईला गेले. त्याठिकाणी दोघांही आरोपींना ताब्यात घेऊन साताऱ्यात आणले. या खूनप्रकरणात एकूण पाचजणांना अटक झाली आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, हवालदार विश्वनाथ संकपाळ, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर, गणेश कापरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, विशाल पवार, रोहीत निकम, सचिन ससाणे आदींनी सहभाग घेतला.