वाई : राज्य शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाने व जलसंपदा विभागाच्या विशेष सहकार्याने पर्यटनाच्या वाढीसाठी सुरू केलेल्या हवाई वाहतुकीची चाचणी घेण्यात आली. वाई तालुक्यातील धोम धरणाच्या जलाशयात ‘सी प्लेन’ने यशस्वीरीत्या लॅडिंग केले. त्यामुळे लवकरच मुंबई ते धोम धरण हवाई वाहतूक सुरू होऊन महाबळेश्वर-पाचगणीतील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील पर्यटनाला अधिक चालना मिळण्यासाठी पर्यटन विकास महामंडळ व जलसंपदा विभागाने विमानसेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याच्या हेतूने व सुखकर प्रवास आणि वेळेची बचत व्हावी यासाठी ‘सी प्लेन’ची संकल्पना पुढे आली. हवेतून व पाण्यातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या ‘सी प्लेन’चा प्रारंभ काही दिवसांपूर्वीच मंबईत करण्यात आला होता. पाचगणी-महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेता पर्यटन महामंडळाने मुंबई ते धोम धरण सेवाही सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. गुरूवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास बोरीवजवळ धोम धरणाच्या जलाशयात ‘सी प्लेन’ने यशस्वीरीत्या लॅडिंग केले. बोटिंग क्लबपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर लॅडिंग झाल्यानंतर संबंधित कंपनी व आर्मीच्या अधिकाऱ्यांनी १५ मिनिटे विमानातून धरण व परिसराची पाहणी केली. त्यानंतर विमानाने उड्डाण घेतले. या चाचणीचा अहवाल संबंधित कंपनीचे अधिकारी आणि आर्मी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाला दिल्यानंतर कदाचित पुढील महिन्यात हवामानाचा अंदाज घेऊन ‘सी प्लेन’ सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)पर्यटकांचा ओढा वाढणार...या सेवेमुळे देश-विदेशातील पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात पाचगणी-महाबळेश्वरला वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर पश्चिम घाट, सह्याद्रीच्या रांगा, धोम-बलकवडीचा जलाशय याकडे पर्यटकांचा ओढा आणखी वाढेल. त्यातच सध्या या परिसराने चित्रपटसृष्टीलाही भुरळ घातली आहे. ‘सी प्लेन’ सेवा सुरू झाल्याने या भागातील दळणवळण यंत्रणा गतिमान होणार आहेच. त्याचबरोबर हॉटेल, पर्यटनपूरक व्यवसायालाही चालना मिळणार आहे.
मुंबई ते महाबळेश्वर... व्हाया धोम!
By admin | Published: August 29, 2014 9:16 PM