सातारा : सातारा पालिकेच्यावतीने सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातील दुकाने, टपऱ्या, गुऱ्हाळघरे तसेच इतर अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली. या कारवाईच्या धास्तीने काही विक्रेत्यांनी आपली अतिक्रमणे स्वत:हून काढली.शहरातील अतिक्रमणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सार्वजनिक रस्ते, चौक, फूटपाथ सर्वच ठिकाणी हातगाडीधारक, फळविक्रेते व छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी बस्तान बसविल्याने शहरातील रस्ते केवळ नावापुरतेच उरले आहेत.
या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, पादचाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही नगरसेवकांनी अतिक्रमणाच्या विषयावरून प्रशासनाला कोंडीत धरले होते. यानंतर मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी शहरातील अतिक्रमणे सोमवार, दि. १८ पासून हटविण्याची घोषणा केली होती.त्यानुसार पालिकेच्या अतिक्रमण विभागाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. पहिल्याच दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातील चहाच्या गाड्या, टपऱ्या, गुऱ्हाळघरे तसेच इतर बांधकामे जेसीबी व बुलडोजरच्या साह्याने हटविण्यात आली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात दिवसभर ही मोहीम सुरू होती. मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी स्वत: या मोहिमेत सहभाग घेतला.