मलकापूर : कोरोनाचा कहर थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी डॉक्टरांना सहकार्य करण्याचे
आवाहन केले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी केवळ बेड वाढवून चालणार नाही तर
कोरोनाची साखळीच तोडणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची
आहे. त्यानुसार मलकापूर पालिकेने शहरातील खासगी डॉक्टरांची कार्यशाळा
घेतली. यावेळी सर्वांच्या सहकार्यातून शहर कोरोनामुक्त करण्याचा निर्धार या कार्यशाळेत करण्यात आला.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार भविष्यातील कोरोना परिस्थितीवर
मात करण्यासाठी मलकापूर नगरपालिका व काले प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या
संयुक्त विद्यमाने पालिकेच्या हॉलमध्ये शहरातील खासगी डॉक्टरांचे गुरुवारी
प्रशिक्षण झाले. या प्रशिक्षणास शहरातील सर्व विभागांतील ५० पेक्षा जास्त
खासगी डॉक्टर उपस्थित होते. या प्रशिक्षणामध्ये काले प्राथमिक आरोग्य
केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. यादव व डॉ. पी. जी. कागदी यांनी
खासगी डॉक्टरांना मार्गदर्शन केले. तसेच खासगी डॉक्टरांनी उपस्थित केलेल्या
शंकांचे त्यांनी निराकरण केले. या प्रशिक्षणात मलकापुरात कोरोनाचा वाढता
प्रादुर्भाव विचारात घेता स्थानिक डॉक्टरांनी प्राथमिक स्तरावर वेळीच योग्य
उपचार करण्यासाठी त्यांना निर्देश देण्यात आले.
यावेळी डॉ. आर. बी. पाटील व डॉ. पी. जी. कागदी यांनी कोविडमध्ये रुग्णांची देखभाल कशी घ्यावी, याबाबत स्लाईड शोद्वारे
मार्गदर्शन केले. एखाद्या रुग्णास लक्षणे दिसल्यास त्याला त्वरित कोरोना चाचणी करून घेण्यास सांगणे. त्याचबरोबर संबंधितास होम क्वॉरंटाईन
होण्याबरोबरच काळजी घेण्यास सांगणे. काळजी न घेतल्यास आपल्या कुटुंबालाही धोका निर्माण करतो हे डॉक्टरांनी आपापल्या पातळीवर रुग्णांना सांगावे.
मात्र, लक्षणे आढळूनही काही रुग्ण ऐकत नसल्याची बाब काही डॉक्टरांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर
म्हणाले, ‘ही बाब तुम्ही त्वरित त्या प्रभागातील नगरसेवक, लोकप्रतिनिधी किंवा पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली पाहिजे. ते संबंधिताला
उपचारांबाबत माहिती देऊन उपचार घेण्यास किंवा काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन करतील. प्रादुर्भाव वाढल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा वेळीच त्यावर नियंत्रण मिळविता येईल. त्यामुळे प्रशासनावरून ताण कमी होऊन कोरोनाची चेन ब्रेक होण्यास मदत होईल. या प्रशिक्षणात सविस्तर चर्चा करून शहराला कोरोनामुक्त करण्याचा निर्धार केला. वरिष्ठ लिपिक ज्ञानदेव साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट..
सध्या डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची... स्वतंत्र ग्रुप तयार
प्रशासन
वरिष्ठांकडून होणाऱ्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे काम करीत आहे. प्रशासनाला
खासगी डॉक्टरांची मदत झाल्यास आपण कोरोनाला निश्चित रोखू शकतो. कोरोनाचा
वाढता कहर रोखण्यासाठी खासगी डॉक्टरांची फार मोठी मदत होणार आहे. त्यासाठी
मलकापूर नगरपालिकेने स्वतंत्र ग्रुप तयार केला आहे.
- राहुल मर्ढेकर, मुख्याधिकारी, मलकापूर
फोटो २४मलकापूर डॉक्टर
मलकापूर नगरपालिका व काले प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पालिकेच्या हॉलमध्ये शहरातील खासगी डॉक्टरांचे प्रशिक्षण झाले.