वाई : शहरात व्यापारी तसेच व्यावसायिकांकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणावर मंगळवारी (दि. १४) पालिकेच्या वतीने बुल्डोजर चालविण्यात आला. या मोहिमेस सकाळी दहा वाजता भाजी मंडईतून सुरुवात झाली. दरम्यान, हॉकर्स संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंडईत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी होत होती. या बाबीची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी पालिकेला अतिक्रमण हटविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी पालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली.
मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेचे तीस कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. प्रारंभी भाजी मंडईतील अतिक्रमण हटविण्यात आले. मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर अनेक व्यापारी व विक्रेत्यांनी स्वत:हून अतिक्रमण काढले.
दरम्यान, सोमवारी हॉकर्स संघटनेच्या वतीने अतिक्रमण हटविल्यास आत्मदहन करण्याचा इशारा मुख्याधिकारी काटकर यांना दिला होता. या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रसाद काटकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.