कऱ्हाडात धोकादायक इमारतींचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात या इमारती नागरिकांच्या डोक्यावर काळ बनून राहतात. पालिका केवळ सर्व्हेचा सोपस्कार पार पाडून या इमारतींकडे दुर्लक्ष करते. या वर्षी केलेल्या सर्व्हेमध्ये शहरात ५३ इमारती धोकादायक असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले. संबंधित इमारतींपैकी बहुतांश इमारतीत कोणीही वास्तव्यास नाही. मात्र, तरीही त्या इमारती पाडण्यात आल्या नाहीत. पालिकेकडून केवळ नोटीस पाठवून मिळकतधारकाला इमारत पाडण्याविषयीची सूचना दिली जात होती. मात्र, मिळकतधारक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे दिवसेंदिवस हा प्रश्न गंभीर बनत होता. त्यातच चार दिवसांपूर्वी शहरातील मंगळवार पेठेतील एका इमारतीचा काही भाग कोसळला. सुदैवाने त्यामध्ये जीवितहानी झाली नाही. मात्र, या इमारती किती धोकादायक आहेत, हे ‘लोकमत’ने वृत्ताद्वारे मांडल्यानंतर पालिकेने मंगळवारपासून अशा धोकादायक इमारती पाडण्याचे काम हाती घेतले आहे.
मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी मंगळवार पेठेतील इमारत पाडण्यात आली. जेसीबी, ट्रॅक्टरसह बांधकाम व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला.
फोटो : २२केआरडी१०
कॅप्शन : कऱ्हाडातील मंगळवार पेठेतील धोकादायक इमारत मंगळवारी पालिकेच्या बांधकाम विभागाने जमीनदोस्त केली. (फोटो : अरमान मुल्ला)
फोटो : २२केआरडी११
कॅप्शन : लोकमत वृत्त