सातारा : स्वाभिमान दिनाचे औचित्य साधून सातारा पालिकेने मंगळवार, दि. १२ रोजी किल्ले अजिंक्यताऱ्यावर विशेष सभेचे आयोजन केले आहे. किल्ल्यावर प्रथमच होणाऱ्या या सभेला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली असून, सभेत किल्ल्याच्या संवर्धनाबाबत चर्चा केली जाणार आहे.
छत्रपती शाहू महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून सातारा शहराची स्थापना केली. दि. १२ जानेवारी रोजी त्यांचा किल्ले अजिंक्यताऱ्यावर राज्याभिषेक झाला होता. शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने दरवर्षी हा दिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा केला जातो. अजिंक्यतारा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असल्याने किल्ल्यावरील राजसदरेवर पालिकेची एक तरी सभा व्हावी, अशी अपेक्षा शिवप्रेमींनी अनेकदा व्यक्त केली होती. त्यानुसार मंगळवारी प्रथमच किल्ल्यावर पालिकेकडून विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील अजिंक्यतारा किल्ल्यावर सभा घेण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला केल्या होत्या. सकाळी दहा वाजता होणाऱ्या या सभेत अजिंक्यतारा किल्ल्याच्या संवर्धनावर चर्चा केली जाणार असून, किल्ल्याच्या विकासाचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी नगरविकास विभागाकडे पाठविला जाणार आहे. नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पालिकेतील सर्व महिला सभापती, नगरसेवक व कर्मचारी या सभेला उपस्थित राहणार आहेत.