कराड : येथील पालिका शाळा क्रमांक तीनच्या वतीने जावळी तालुक्यातील डांगरधर गावातील पूरग्रस्तांना शिक्षक व पालकांकडून जमा केलेल्या मदतीतून शंभर धान्य किट व अत्यावश्यक वस्तूंचे पंचायत समिती सभापती जयश्री गिरी व गटविकास अधिकारी बुधे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. डांगरधरच्या सरपंच कोमल अग्नी उपस्थित होत्या. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी एक हात मदतीचा उपक्रम सुरू केला असून त्याअंतर्गत पालकांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्याला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जमा झालेले धान्य व अत्यावश्यक साहित्य प्रत्यक्ष बाधित कुटुंबांना वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षक व पालक उपस्थित होते.
जयवंतराव भोसले यांना शिवनगरमध्ये अभिवादन
कराड : शिवनगर, ता. कराड येथील छत्रपती संभाजी विद्यालयात कृष्णा उद्योग समूहाचे प्रमुख जयवंतराव भोसले यांना अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक एस. पी. सावंत यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. मुख्याध्यापक सावंत यांनी जयवंतराव भोसले यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य महान असल्याचे सांगून त्यांच्या दृष्टीमुळे या विभागात शैक्षणिक क्रांती झाल्याचे गौरवोद्गार काढले. त्यांच्या कार्याचा नव्या पिढीला परिचय होणे महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी पर्यवेक्षक एम. बी. दमामे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आदर्श महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल
कराड : मलकापूर येथील आदर्श ज्युनिअर कॉलेजचा बारावी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला. विज्ञान शाखेतील ईशा पाटील, जुवेरिया सय्यद, नीरज घाटगे, वाणिज्य शाखेतील प्रणाली देसाई, कोमल साळुंखे, वर्षा भोसले तर कला शाखेतील सानिका साळुंखे, श्रद्धा काकडे, आरती गंगावणे यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, अध्यक्ष पी. जी. पाटील यांनी सत्कार केला.
वराडेतील ग्रामस्थांनी जपली बांधिलकी
कऱ्हाड : आंबेघर (ता. पाटण) या गावातील भूस्खलन झालेल्या व पूरग्रस्त गरजू कुटुंबांना जीवनावश्यक किटचे वराडे ग्रामस्थांच्या वतीने वाटप करण्यात आले. वराडे ग्रामस्थांनी पूरग्रस्तांना दिलेल्या या मदतीबद्दल पाटणचे तहसीलदार समीर यादव यांना वराडेकरांना प्रमाणपत्र देऊन गौरविले. सरपंच वैशाली साळुंखे, जिल्हा सहकार बोर्ड संचालक संजय साळुंखे, बाजार समितीचे संचालक अंकुश हजारे, उपसरपंच आनंदराव बोराटे, रमेश साळुंखे, माजी उपसरपंच शंकर साळुंखे, प्रकाश शेटे, दिग्विजय कांबळे, अमोल इंगळे, आनंदराव साळुंखे, अप्पासोा साळुंखे, शशिकांत साळुंखे, विजय साळुंखे यांच्यासह वराडेतील ग्रामस्थ उपस्थित होते.