सातारा : सातारा पालिकेच्या सोनगाव डेपोतील कचऱ्याला सोमवारी दुपारी वणव्यामुळे आग लागली. मंगळवारी दुसऱ्या दिवशीदेखील ही आग धुमसत होती. पालिकेच्या अग्निशमन विभागाने टॅँकरच्या चौदा फेऱ्या करून ही आग आटोक्यात आणली. तरीही डेपोतून धुराचे लोट उसळतच होते.
सातारा शहर व उपनगरातील कचरा संकलित करून तो पालिकेच्या सोनगाव कचरा डेपोत टाकला जातो. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की डेपोत आग लागण्याच्या घटना सुरू होतात. मात्र, सोमवारी वणव्यामुळे डेपोतील कचरा पेटला अन् पालिकेची धावाधाव सुरू झाली.
अजिंक्यताऱ्याच्या डोंगरावर सोमवारी दुपारी अज्ञातांकडून वणवा लावण्यात आला. हा वणवा हळूहळू डेपोजवळ आला. वणव्यात एक झाड जळून खाक झाले व त्याची फांदी डेपोतील कचऱ्यात येऊन पडली. बघता-बघता डेपोतील कचरा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. ही घटना निदर्शनास येताच पालिकेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमनचे दोन बंब, दहा कर्मचारी, दोन जेसीबी अशी यंत्रणा आग विझविण्याच्या कामात सक्रिय झाली. टॅँकरच्या तब्बल चौदा फेऱ्या झाल्यानंतर ही आग आटोक्यात आली. जिथून धुराचे लोट उसळत होते त्या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने माती टाकण्यात आली.
फोटो : २० सोनगाव डेपो
सातारा पालिकेच्या सोनगाव कचरा डेपोत लागलेली आग पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून विझविण्यात आली. (छाया : जावेद खान)