कऱ्हाड : शहरात मोकाटपणे फिरणाऱ्या जनावरांना ठेवण्यासाठी पालिकेकडे जागा नाही. तसेच यावर पालिकेला ठोस उपाय देखील करता येत नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील नव्याने करण्यात येणाऱ्या विकासकामांसाठी, नागरिकांच्या सुविधा व सोयींबाबत प्रत्येकवर्षी मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात पालिकेकडून तरतूद केली जाते. शिवाय त्या तरतुदीची पूर्तताही पालिका करते; मात्र शहरातील मोकाट जनावरांच्या समस्यांबाबत नुसत्या तरतुदीच केल्या जात आहेत.कोंडवाडा बांधणे व दुरुस्तीसाठी ५० हजारांची तरतूद गेल्या वर्षी अर्थसंकल्पात केली होती. यंदा मात्र कोंडवाड्यासाठी वाढीव स्वरूपात १ लाख रूपयांची तरतूद पालिकेने केली आहे. अशा प्रकारे पंधरा वर्षांपासून प्रत्येकवर्षी अर्थसंकल्पात कोंडवाडा उभारणीची तरतूद केली जात आहे. त्याची पूर्तता मात्र केली जात नाही. कऱ्हाड पालिकेचा २०१५-१६ सालचा १३८ कोटींचा अर्थसंकल्प २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या विशेष सभेत मांडण्यात आला. या अर्थसंकल्पास आता तीन महिने पूर्ण होत आले आहेत. २०१५-१६ वर्षात मांडलेल्या नियोजित विकासकामांच्या आराखड्यातील पालिकेच्या तरतुदीमध्ये कोंडवाडे इमारत बांधकाम व दुरुस्तीसाठी १ लाख रूपयांची अंदाजित रक्कम धरण्यात आली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पास आता फक्त नऊ महिने बाकी राहिले असल्याने पालिका कोंडवाड्याचा प्रश्न मार्गी लावणार का? हे पाहणे गरजेचे आहे.शाळा अन् शॉपिंग सेंटरच्या ठिकाणी असलेला कोंडवाडा हा वाखाण येथील खुल्या जागेत सुद्धा पालिकेला उभारता आला असता. मात्र, शहराच्या विकास आराखड्यास शासन मंजुरी अद्याप मिळाली नसल्याचे समजून येत आहे. शहरात मोकाट फिरणाऱ्या गायी, गाढव, बैल तसेच कुत्र्यांना पकडून कोंडवाड्यात ठेवण्यात यावे, अशी शहरातील नागरिक, दुकानदार व प्रवाशांकडून मागणी करण्यात आलेली आहे. मात्र, पालिकेला स्वत:चा असा कोंडवाडा नसल्याने तो बांधण्यासाठी जागाही नाही. मोकाट फिरणाऱ्या जनावरांची सोय पालिकेकडून केली जात नसल्याने गेल्या पंधरा वर्षांपासून मोकाट जनावरांची समस्या शहरवासीयांना सतत भेडसावत आहे. तसेच पालिकेकडे या समस्यांबाबत तक्रारी केल्या जात आहेत. (प्रतिनिधी) तरतूद होते मात्र कार्यवाही नाही...पालिकेच्या जागेत शॉपिंग सेंटर उभारण्यात आल्याने त्याही ठिकाणी असलेला कोंडवाडा हलविण्यात आला. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत पालिकेला कोंडवाडाही बांधता आला नाही. विशेष म्हणजे, एकीकडे पालिकेनेच कोंडवाडा हटवला असून, कोंडवाडा इमारत बांधणे व दुरुस्तीसाठी गेल्या पंधरा वर्षांपासून दरवर्षीच्या वार्षिक अर्थसंकल्पात पालिकाच ठराविक खर्चाची तरतूद करत आहे. मात्र, प्रत्येक्ष कार्यवाही काही केली जात नाही.पालिकेच्या निर्णयाकडे नागरिकांचे लक्षकऱ्हाड पालिकेकडून १५ वर्षे झाले शहरातील मोकाटपणे फिरणाऱ्या जनावरांच्या कोंडवाड्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आलेला नाही. याबाबत अधिकाऱ्यांकडून देखील अद्याप कोणत्या उपाययोजना आखण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पावसाळ्यामध्ये जनावरांसाठी कोंडवाडा उभारण्याबाबत पालिका कोणत्या ठोस उपाययोजना करणार. उपाययोजना केल्यास त्या तात्पुरत्या स्वरूपात करणार की कायमस्वरूपी याकडे शहरवासीयांचे लक्ष लागू राहिले आहे.गेल्यावर्षी ५० हजार तर यंदा १ लाखकऱ्हाड पालिकेच्या वतीने प्रत्येकवर्षी मांडल्या जाणाऱ्या वार्षिक अर्थसंकल्पात शहरातील प्रत्येक विकासकामावर वर्षभर करण्यात येणाऱ्या खर्चाची तरतूद केली जाते. २०१४ वर्षी पालिकेकडून शहरात कोंडवाडे बांधणे तसेच दुरुस्ती करणे, यासाठी ५० हजार रुपये तरतूद करण्यात आली होती. तर २०१५-१६ या वर्षीच्या अर्थसंकल्पात कोंडवाडा बांधणे व दुरुस्तीसाठी १ लाख रुपयांची तरतूद आहे. तीन महिने गेले, राहिले फक्त नऊ महिने...पालिकेचे वर्ष हे अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सुरू होते. एप्रिल ते मार्च असे वर्ष धरले जात असल्याने अर्थसंकल्पातील वर्षानुसार आता तीन महिने पूर्ण झाले आहेत. आता पालिकेचे अर्थसंकल्पाचे वर्ष संपण्यास नऊ महिने बाकी राहिले आहेत. या नऊ महिन्यांत तरी पालिका शहरातील मोकाट जनावरांच्या समस्यांसाठी मार्ग काढेल का ? अशी विचारणा स्थानिकांतून होत आहे.आरोग्य, बांधकामकडून कार्यवाही होणार का ?पालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिक तसेच शहरातील जनावरांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. तर जनावरांच्या जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी कोंडवाडा बांधणे त्यांची दुरुस्ती करणे ही जबाबदारी पालिकेच्या बांधकाम विभागावरती असते. मात्र, या दोन्ही विभागाकडून वर्षभरात शहरातील मोकाट जनावरांबाबत कोण- कोणत्या उपाययोजना आखण्यात आल्या, कोंडवाडे बांधून त्यामध्ये मोकाट जनावरांना ठेवण्यात आले का? तसेच यावर्षी तरी या विभागाकडून उपाययोजना आखल्या जातील का ? असे सवाल नागरिकांतून विचारले जात आहेत. मोकाट जनावरांचा त्रास सर्वांनाच होत आहे. कऱ्हाड पालिकेच्या अर्थसंकल्पात कोंडवाडा बांधणीसाठी तरतूद करूनही त्याच्या उभारणीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. कऱ्हाड शहरामध्ये प्राणी व पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आहेत. त्यांची मदत घेऊन ही समस्या सहज आटोक्यात आणता येऊ शकते; पण इच्छाशक्तीचा अभाव असल्याने हा प्रश्न सुटणे अवघड आहे.- विवेक ढापरे, नागरिक, कऱ्हाडशहरात २६ ते २७ ठिकाणी पालिकेची आरक्षित जागा आहे. मात्र, याबाबत कोणीच बोलत नाही. शहरात मृतावस्थेत पडणाऱ्या मोकाट जनावरे, प्राण्यांसंदर्भात प्राणीमित्रांनी अनेकवेळा आवाज उठविला होता. मृत पावणाऱ्या व मोकाट जनावरांची व्यवस्था करावी, अशी मागणी केली. आम्ही या मासिक सभेमध्ये कोंडवाडे तसेच नालेसफाईबाबत प्रशासनास जाब विचारणार आहोत.- विक्रम पावसकरनगरसेवक, नगरपालिका, कऱ्हाडग्रामीण भागात डोंगर कपारीत चरत असताना दुसऱ्या गावातून मोकाट जनावरे ही गावात आल्यावर त्यांना पकडून गावातील कोंडवाड्यात आणून बांधले जाते. आजही ग्रामीण भागातील काही गावांत जनावरांसाठी कोंडवाडे आहेत. मात्र, शहरात कोंडवाडे नसल्याने या ठिकाणी मोठ्या संख्येने मोकाट जनावरे पाहायला मिळत आहेत.- नानासाहेब चव्हाणशेतकरी, किरपे, ता. कऱ्हाडशहरातील फूटपाथ, सिग्नल तसेच मुख्य रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरे बसलेली असतात. रस्त्याच्या मध्ये असलेल्या दुभाजकावर जनावरे बसल्याने त्यांचा वाहतुकीला अडथळा होतो. रस्त्यावरून गाडी चालवताना तसेच प्रवास करीत असताना या जनावरांकडून त्रास होतो. पालिकेने शहरात फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.- वैभव कांबळे, महाविद्यालयीन विद्यार्थी
पालिका कोंडवाड्याचा प्रश्न मार्गी लावणार !
By admin | Published: June 29, 2015 10:35 PM