सातारा : सातारा पालिकेच्या बायोमायनिंग प्रकल्पाची कोणतीही सुधारित प्रशासकीय मंजुरी न घेता अनियमित पद्धतीने बिले काढण्यात आल्याची तक्रार नगरविकास आघाडीच्या नगरसेविका लीना गोरे यांचे पती राजू गोरे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. अनियमित बिले मंजूर करणाऱ्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी गोरे यांनी निवेदनात केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सातारा पालिका व राज्य शासन यांची कोणतीही मंजुरी न घेता बायोमागनिंग प्रकल्पाचे २ कोटी ९० लाखांचे अंदाजपत्रक ६ कोटी ४० लाखांपर्यंत वाढविण्यात आले. नगरसेवकांची दिशाभूल करून हा प्रकल्प थेट तांत्रिक मंजुरीला पाठविण्याचे काम तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी केले. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तांत्रिक मंजुरीचा २९ जानेवारी २०१९ असून पालिकेच्या बारनिशीत त्याचे पत्र १ फेब्रुवारी रोजी पोहोचले. त्याच दिवशी बायोमायनिंगचे ई-टेंडर प्रसिद्ध करून ते आदल्या दिवशी ऑनलाइन अपलोड करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. म्हणजे हे सर्व पूर्वनियोजित आहे, असा आरोप गोरे यांनी केला आहे. प्राधिकरणाने तांत्रिक मान्यतेच्या घातलेल्या ३६ अटींचे पालन झालेले नाही. सर्वसाधारण सभेचा ठराव, सुधारित प्रशासकीय मान्यता नसताना १ कोटी ६३ लाख रुपयांची बिले देण्याची घाई करण्यात आल्याचेही गोरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
सोनगाव कचरा डेपोत निर्देशाप्रमाणे कोणतेही कचऱ्याचे ढीग नाहीत. डेपोला सातत्याने आग लागत असल्याने कचरा जळून खाक होत आहे. या प्रकल्पाची सोनगाव ग्रामस्थांनी अनेकदा मोर्चा आणून तक्रार केली आहे. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी, तसेच या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी गोरे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री यांच्यासह उप-मुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनावर बायोमायनिंग प्रकल्पाबाबत अनेक आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.