लोकमत न्यूज नेटवर्कवाई : लाचखोरीमुळे नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांच्या विरोधात नागरिकांमध्ये अंसतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे रंगेहाथ पकडलेल्या नगराध्यक्षांनी नितीमत्ता बाळगून राजीनामा द्यावा, अशी मागणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, राजीनाम्यासाठी शुक्रवार, दि. ३० रोजी नागरिकांच्या वतीने पालिकेसमोर मुंडण आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.अनिल सावंत म्हणाले, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची कारवाई ही न्यायप्रविष्ट बाब असली तरीही सुसंस्कृत वाई शहरात चुकीच्या गोष्टींना पाठिंबा मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. नगराध्यक्षांचा पोलिस बंदोबस्तात कारभार चालविण्याचा प्रकार म्हणजे पदाचा अपमान आहे. मोर्चा काढून, वाई शहर बंद ठेवून, आपला राग व्यक्त करून सुध्दा, नगराध्यक्षांना राजीनामा देण्याची इच्छा नाही. त्यामुळे आंदोलनाचे पुढचे पाऊल म्हणून शुक्रवारी वाईकर नागरिक पालिकेसमोर मुंडण करून निषेध व्यक्त करणार आहेत.द्रविड हायस्कूलच्या मुख्याद्यापकांना गुरुवारी शिंदे यांच्या निलंबनासाठी माजी विद्यार्थी लेखी निवेदन देणार असल्याचा इशारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी दिला. यावेळी अॅड.श्रीकांत चव्हाण, भारत खामकर, चरण गायकवाड, संग्राम पवार, प्रदीप चोरगे, दीपक हजारे, संदीप डोंगरे, अजित शिंदे, प्रदीप जायगुडे, संदीप नायकवडी, यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान राष्ट्रवादी पुरस्कृत तीर्थक्षेत्र आघाडीचे अध्यक्ष संजय लोळे यांनी मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन नगराध्यक्षांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.नगराध्यक्षा डॉ.प्रतिभा शिंदे यानी राजीनामा द्यावा, यासाठी राष्ट्रवादीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षा व त्यांच्या पतींवर टिकेची झोड उठवत भाजप व काँग्रेसवरही निशाणा साधला. चौदा हजारांची लाच घेताना सापडलेल्या नगराध्यक्षांनी वास्तविक लगेच दुसऱ्या दिवशी केलेल्या कृत्याविषयी वाईकरांची माफी मागून राजीनामा देणे आवश्यक असतानाही त्या " तो मी नव्हेच " अशा पध्दतीने वावरत पोलिस बंदोबस्तात पालिकेत हजार होऊन मी निर्दोष असल्याचा कांगावा करत असल्याचा आरोप होत आहे. स्वत:ला सुसंस्कृत व उच्चशिक्षित समजाणाऱ्या नगराध्यक्ष व त्यांच्या पतीने सांस्कृतिक वाईनगरीचे नाक कापले असल्याची संतप्त भावना नागरिकांची असल्याचा दावा तीर्थक्षेत्र आघाडीने केला आहे. राजकारण असो की समाजकारण, वाईने नेहमीच महाराष्ट्रासमोर आदर्श ठेवला आहे. ऐतिहासिक, अध्यात्मिक व विद्वत्ता हे वाईचं वैभव आहे.
नगराध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी उद्या मुंडण
By admin | Published: June 28, 2017 11:16 PM