कऱ्हाड: एक घाव, दोन तुकडे, असं म्हणतात. डोंगरावर वसलेल्या जंगलवाडी गावातल्या ग्रामस्थांचंही असंच झालंय. एक गाव; पण दोन तुकडे, अशी या गावाची तऱ्हा आहे. एकाच ठिकाणी वसलेलं हे सुमारे चारशे लोकवस्तीचं गाव कऱ्हाड आणि पाटण तालुक्यांत विभागलं गेलंय. त्यामुळे ‘आधे इधर, आधे उधर,’ अशी परिस्थिती आहे.
जंगलवाडी हे गाव नावाप्रमाणेच गर्द झाडीत आणि डोंगराच्या माथ्यावर वसलंय. या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. डोंगरातील पायवाटेवरून ग्रामस्थांची बारमाही पायपीट सुरू असते. ज्यावेळी हे गाव वसलं, तेव्हापासून या गावामागे विभागणीचं ग्रहण लागलं. गावात साधारणपणे शंभरच्या आसपास घरे आहेत. मात्र, यातील काही घरे कऱ्हाड तालुक्याच्या हद्दीत तर काही पाटण तालुक्याच्या हद्दीत आहेत. गावाचा काही भाग कऱ्हाड तालुक्यातील कोरीवळे गावच्या हद्दीत तर काही भाग पाटण तालुक्यातील जाधववाडी गावच्या हद्दीत येतो. महसुलीदृष्ट्या हे गाव एकाच तालुक्यात घ्यावे, अशी येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी मागणी केली आहे. मात्र, त्यांच्या मागणीला अद्याप यश आलेले नाही.
तालुक्याप्रमाणेच या गावाला मतदार संघही दोन आहेत.कऱ्हाड उत्तर आणि पाटण विधानसभा मतदार संघामध्ये या एकाच गावाची विभागणी झाली आहे. गावातील काही घरे कºहाड उत्तर विधानसभा मतदार संघात येतात. तर काही पाटण मतदार संघात. त्यामुळे डोंगरावर वसलेल्या या गावाकडे लोकप्रतिनिधी म्हणावे तेवढे लक्ष देत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. पाटणचे आमदार शंभूराज देसाई आणि कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या प्रयत्नातून या गावासाठी काही कामे केली असली तरी मूलभूत गरजांसाठी नेहमीच झगडावे लागत असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.
गाव एकच; पण तालुके दोन असल्यामुळे त्याच्या महसुली नोंदी वेगवेगळ्या ठिकाणी विभागल्या गेल्या आहेत. परिणामी, ग्रामस्थांना त्यांच्या शासकीय कामासाठी हेलपाटे घालावे लागतात.रस्त्याचा प्रश्न गंभीरप्रत्येक गावाचा आणि त्या गावातल्या ग्रामस्थांचा या ना त्या कारणाने तालुक्याशी संबंध येतो. महसूल किंवा प्रशासकीय कारणास्तव ग्रामस्थ तालुक्याला येत-जात असतात. मात्र, या गावाला चांगला रस्ताच नाही. त्यामुळे गावात कसलेच वाहन येत नाही. कोरीवळेतून घनदाट झाडीतून सुमारे साडेतीन किलोमीटरची पायपीट करावी लागते. तर चाफळ बाजूकडून सुमारे दीड किलोमीटरची पायपीट करीत या गावात पोहोचावे लागते.डोंगरावर वसलेल्या याच जंगलवाडी गावाची कऱ्हाड आणि पाटण या दोन तालुक्यांत विभागणी झाली आहे.