पुसेगाव/खटाव : खटाव येथे झोपलेल्या तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगाव पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. संशयित खटावमधीलच आहे. अनैतिक संबंधातून हा खुन झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पुसेगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. २३ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास खटाव (ता. खटाव) येथे रोहीत उर्फ विकास उर्फ विकी शांताराम सावंत (वय ३०) याचा घरासमोर झोपल्यावर अज्ञाताने डोक्यात दगड घालून निर्घुणपणे खून केला होता. याप्रकरणी पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल, पोलिस उपअधीक्षक सोनाली कदम यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर व पुसेगावचे सहायक पोलिस निरीक्षक आशीष कांबळे यांना पुढील कारवाईबाबत सूचना केली. देवकर यांनी सहायक निरीक्षक पृश्वीराज ताटे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या अधिपत्याखाली पथक तयार करुन आरोपीस ताब्यात घेण्याबाबत मार्गदर्शन केले.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन परिसरातील लोकांकडे विचारपूस केली. त्यावेळी मृत राेहीत सावंत याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. तसेच त्याच महिलेचेही खटावमधीलच आणखी एका व्यक्तीशीही अनैतिक संबंध आहेत, अशी माहिती प्राप्त झाली. यावरुन संशयित विकास दीपक कांबळे (वय २८, रा. आंबेडकरनगर, खटाव) याला ताब्यात घेतले. चाैकशी केल्यावर त्याने रोहित सावंत याचे संबंधित महिलेशी अनैतिक संबंध होते. या रागातून डोक्यात दगड घालून खून केल्याचे सांगितले.
पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहायक निरीक्षक आशीष कांबळे, पृश्वीराज ताटे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, तानाजी माने, सुधीर येवले, हवालदार सुधीर बनकर, मंगेश महाडिक, सचिन साळुंखे, सनी आवटे, मनोज जाधव, प्रवीण कांबळे, अमित माने, राजू कांबळे, केतन शिंदे, वैभव सावंत, शिवाजी गुरव, सुधाकर भाेसले, चंद्रहार खाडे, सुभाष शिंदे, धनंजय शिंदे, योगेश बागल, गीतांजली काटकर, सुनील अबदागिरे, अशोक सरक, प्रमोद कदम, शंकर सुतार, अमोल जगदाळे, अविनाश घाडगे, अश्वीनी नलवडे, कविता बरकडे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.