सातारा : मारहाणीत जखमी झालेल्या सैदापूर (ता. सातारा) येथील जवानाचा उपचारादरम्यान पुण्यात मृत्यू झाला. या प्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरून अज्ञातावर गुन्हा नोंद झाला आहे. अगोदर पुण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर झिरो क्रमांकाने हा गुन्हा सातारा तालुका पोलीस ठाण्यात वर्ग झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संदीप पवार (रा. सैदापूर) असे मृत सैनिकाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांची पत्नी चेतना पवार यांनी फिर्याद दिली आहे. संदीप पवार हे सैनिक होते. ते सुटीवर आले होते. दि. २७ डिसेंबर रोजी संदीप पवार साताऱ्यातच मारहाण झाली होती. बेदम मारहाण झाल्याने ते जखमी अवस्थेत घरी आले. त्यांच्या हातापायातून रक्त वाहत होते. गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, जवान संदीप पवार यांच्या मृत्यूनंतर पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर झिरोने सातारा तालुका ठाण्यात वर्ग झाला आहे. पोलिसांनी मारहाणकर्त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. सातारा तालुका पोलिसांबरोबर स्थानिक गुन्हे शाखाही मारहाणकर्त्यांचा शोध घेत आहे.