कºहाड/ तांबवे : शेतजमिनीच्या वादातून पुतण्याने चुलत्याचा दगडाने ठेचून खून केला. पाठरवाडी (ता. कºहाड) येथे रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरा पुतण्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. बाळकृष्ण ऊर्फ कृष्णात रामा यादव (वय ५०) असे खून झालेल्याचे नाव आहे, तर संजय ज्ञानदेव यादव याला पोलिसांनी ताब्यात घेतले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाठरवाडी येथे बाळकृष्ण यादव यांची शेतजमीन आहे. जमिनीशेजारी पुतण्या संजय यादव याचीही जमीन आहे. अनेक वर्षांपासून या दोन कुटुंबांत जमिनीवरून वाद होता. या वादातूनच त्यांची अनेकवेळा हमरीतुमरी तसेच मारामारीही झाली होती. रविवारी सायंकाळी बाळकृष्ण ‘हुमणीचा पेढा’ नावाच्या शिवारातील शेतामध्ये होते, तर त्यांची पत्नी ‘टेकडी’ नावाच्या शिवारातील शेतात काम करीत होती. सायंकाळच्या सुमारास पुतण्या संजय टेकडी नावाच्या शिवारात गेला. त्या ठिकाणी त्याने बाळकृष्ण यांच्या पत्नीशी वाद घालून हाताने मारहाण केली. तसेच तो तेथून थेट हुमणीचा पेढा नावाच्या शिवारामध्ये बाळकृष्ण यांच्याकडे गेला. (पान १० वर)शेतात बाळकृष्ण काम करीत असताना त्याने त्यांच्याशी जमिनीच्या कारणावरून वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी बाळकृष्ण यांनी त्याला प्रत्युत्तर केले. या वादातच त्यांची झटापट होऊन संजयने रागाच्या भरात नजीकच पडलेला दगड उचलून बाळकृष्ण यांच्या डोक्यात घातला. घाव वर्मी बसल्याने बाळकृष्ण गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. मात्र, तरीही संजयने दगडाचे अनेक घाव बाळकृष्ण यांच्या डोक्यावर घातले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. काही वेळानंतर संजय तेथून निघून गेला.पुतण्याला घरातून घेतले ताब्यातबाळकृष्ण यांचा खून केल्यानंतर संजय तेथून घरी निघून गेला. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता संजयने खून केला असावा, असा संशय बाळकृष्ण यांच्या पत्नीने व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी गावात जाऊन संजयला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली.दरम्यान, सायंकाळी सहाच्या सुमारास काही ग्रामस्थ शेतातून घरी जात असताना बाळकृष्ण रक्ताच्या थारोळ्यात मृत पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती तातडीने कºहाड तालुका पोलिसांना दिली. पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, उपनिरीक्षक ए. एस. भापकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी तातडीने त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून रात्री उशिरा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवून दिला. घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसांत झाली नव्हती.
जमिनीच्या वादातून चुलत्याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 11:57 PM