कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील जळगाव येथे तलवार आणि कोयत्याने वार करुन तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला. याप्रकरणी गावातीलच सहा जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. वैभव विकास ढाणे (रा. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. जुन्या भांडणातून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या खूनानंतर कोरेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काल, गुरुवारी, (दि. ३१ मार्च) रात्री पावणे बाराच्या सुमारास जळगाव येथील भैरोबाचे मंदिर परिसरात हा प्रकार घडला. यावेळी संशयितांनी वैभव ढाणे या तरुणावर जुन्या भांडणाच्या कारणातून तलवार आणि कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने वैभव ढाणे यांचा मृत्यू झाला.याप्रकरणी मृत वैभव यांचा भाऊ शुभम ढाणे यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर प्रशांत पांडुरंग भोसले, सौरभ संजय भोसले, किरण संजय भोसले, हुसेन बेग, मनोज शिरतोडे आणि रोहन सुभाष भोसले (सर्व रा. जळगाव) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.
पुर्ववैमनस्यातून कोरेगाव तालुक्यातील तरुणाचा तलवार, कोयत्याने वार करुन खून
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 1:09 PM