सातारा : सातारा शहराजवळील वाढे परिसरात सुरजकुमार मारुती निगडे या तरुणाचा तोंडावर, छातीवर दगड घालून खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तिघां संशितांना ताब्यात घेतले आहे. आपासातील वादातून हा प्रकार झाल्याची माहिती मिळत असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, याप्रकरणी मृत सुरजकुमारचा भाऊ चंद्रकुमार निगडे (वय २३, रा. वाढे) याने तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार सातारा तालुक्यातील वाढे परिसरातील मळा नावाच्या शिवारात खुनाची ही घटना घडली.
वेण्णा नदी लगतच सुरजकुमार निगडे (रा. वाढे) याचा मृतदेह आढळून आला. सुरजकुमारचा खून छाती आणि तोंडावर दगड मारुन करण्यात आला. दगडाच्या माराने तो जागीच मृत्युमुखी पडला होता. गुरूवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आपापसातील वादातून व रागातून खून झाल्याची तक्रार आहे.याप्रकरणी दीपक विश्वनाथ दहिया (रा. वाढेफाटा), विजय भीमराव जाधव (रा. वाढे) आणि मोहन भास्कर कदम (रा. खेड, ता. सातारा) यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली आहे. तिघाही संशयितांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.दरम्यान, खुनाची घटना समजल्यानंतर सातारा तालुका पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपासाच्या दृष्टीने आवश्यक ती माहिती घेतली आहे.