नितीन काळेल सातारा :सातारा शहरातील राजवाडा परिसरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास एका तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे. तर प्राथमिकदृष्टया दोन हल्लेखोर दिसून आले असून त्यांचा शोध सुरू आहे.
याबाबत घटनास्थळावरुन प्राथमिकदृष्टया मिळालेली आणि पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास शहरातील राजधानी टाॅवर्ससमोरील समऱ्थ मंदिर रस्त्यावर महिला आणि तरुणात वाद सुरू होता. त्यानंतर याठिकाणी आणखी काहीजण आले. यावेळी त्यांनी तरुणावर कोयत्याने हल्ला केला. डोके, खांदा, पाठीवर हे वार झाले. यामुळे रस्त्यावरच रक्त सांडले. या हल्ल्यानंतर जखमी तरुणाला दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
पण, प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी त्याला पुणे येथे हलिवण्यात आले आहे. संबंधित तरुणाचे नाव गणेश शंकर पैलवान असल्याची माहिती मिळत असून तो शहरातीलच रहिवाशी आहे. तर या हल्ल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे. इतर हल्लेखोर फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. तर रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा नोंद झाला नव्हता.
पोलिस अधीक्षकांची घटनास्थळी भेट... पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी रात्री आठच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी शाहूपुरी ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय पतंगे उपस्थित होते. तर सातारा शहरात पेट्रोलिंग सुरू आहे. अशा घटना घडल्यास पोलिस घटनास्थळी जाऊन कारवाई करत आहेत. गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचे काम पोलिस करत असून जागरुक नागरिक म्हणून पिडीतास मदत आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक शेख यांनी केले आहे.