वडगांव हवेली : विभागात गत महिनाभरापासून ग्रामपंचायत निवडणुकांचे धुमशान सुरु होते. सोमवारी निवडणुकीचा निकाल जाहिर झाला. त्यामध्ये विभागातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये डॉ. अतुल भोसले समर्थक गटाने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. तर विरोधी गटासह अपक्षांनी थोड्या प्रमाणात यश प्राप्त केले आहे.
शेरे येथे डॉ. अतुल भोसले गटाने सत्ता अबाधित राखली असून पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम यांच्या भीमाशंकर ग्रामविकास पॅनेलने पंधरापैकी चौदा जागांवर विजय मिळवला आहे. तर विरोधी माऊली ग्रामविकास पॅनेल भीमाशंकर परिवर्तन पॅनेलला एकही जागा मिळवता आली नाही. अपक्ष उमेदवार सुरेखा दादासाहेब गावडे यांनी एका जागेवर विजय मिळवला.
शेणोली ग्रामपंचायतीत भाजपच्या डॉ. अतुल भोसले गटाच्या समर्थकांनी बाजी मारली असून ग्रामदैवत अकलाईदेवी सहकार पॅनेलने तेरापैकी बारा जागेवर विजय मिळवून सत्तांतर घडवले. विरोधी पॅनेलला एक जागा जिंकता आली. खुबीत पुन्हा भोसले गटाने सत्ता मिळविली आहे. डॉ. अतुल भोसले व मदनराव मोहिते गटाच्या सिद्धनाथ पॅनलने सर्वच्या सर्व नऊ जागांवर विजय प्राप्त केला. या ग्रामपंचायतीत नऊपैकी भोसले गटाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. सात जागांसाठी निवडणूक लागली होती. त्यामध्ये भोसले गटाच्या सिद्धनाथ पॅनेलने सर्व जागांवर विजय मिळवला. या पॅनेलचे नेतृत्व संदीप माने, कुबेर माने, धनाजी पाटील, वैभव पाटील, मदन माने, हनुमंतराव माने, सुनील माने यांनी केले.