जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : आरक्षण देण्याची मागणी; कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी सातारा : साताऱ्यात दि. ३ आॅक्टोबर रोजी काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चास मुस्लीम समाज बांधवांनी पाठिंबा दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आघाडी शासनाने मराठा आणि मुस्लीम समाजाला आरक्षण दिले होते. त्यानंतर हे आरक्षण रद्द झाल्याने सध्याची परिस्थिती उद्भवली आहे. राज्यभरात मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. त्याची गांभीर्याने दखल घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, तरच चुकीच्या प्रवृत्तीला आळा बसण्यास मदत होईल. (प्रतिनिधी) साताऱ्यात उद्या महिलांची बैठकसातारा : साताऱ्यात दि. ३ आॅक्टोबर रोजी निघणाऱ्या ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या अनुषंगाने सातारा येथेही महिलांनी स्वतंत्र बैठकीचे आयोजन केले आहे. सोमवार, दि. १९ रोजी दुपारी एक वाजता सातारा येथील ‘मराठा क्रांती मोर्चा’ कार्यालयामध्ये ही बैठक होणार आहे. यावेळी महिलांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. राजकीय मतभेद विसरून पुसेगावकर एकवटलेपुसेगाव : सातारा येथे दि. ३ आॅक्टोबरला निघणाऱ्या मराठा समाज क्रांती मोर्चासाठी सर्व राजकीय मतभेद विसरून पुसेगावकर ग्रामस्थ प्रथमच एकवटले आहेत. पुसेगाव येथे मराठा मोर्चा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. तसेच दि. १९ रोजी दुपारी १ वाजता पंचक्रोशीतील मराठा बांधवांची बैठक घेण्याचा निर्णय घेतला.मराठा समाजासाठी एक दिवस देण्याच्या उद्देशाने दि. ३ च्या मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. पुसेगाव येथील एका ग्रामस्थाने आपली इमारत विना भाडे घेता कार्यालयासाठी देणार असल्याचे सांगितले. तर ट्रॅव्हल्स, वडाप यासह विविध चारचाकी गाड्या विना मोबदला देणार असल्याचे यावेळी अनेकांनी सांगितले. मोर्चासाठी गांधी टोप्या ...मोर्चाच्या प्रचारासाठी रिक्षा, जीपगाडी, पदयात्रा याचबरोबर सोशल मीडियाचाही मोठा वापर करण्यात येत आहे. वाहनांवर झेंडे लावण्याबरोबरच चारचाकी वाहनांवर मराठा समाज मोर्चाची चित्रे, स्टिकर्स काढण्यात आली आहेत. गांधी टोप्याही बनविण्यात आल्या आहेत. फलटणकर आज इतिहास घडविणार !मोर्चाची जोरदार तयारी : घरे बंद करून सहभागाचे आवाहनफलटण : शहरात दि. १८ सप्टेंबर रोजी निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाच्या पूर्वसंध्येला तयारीचा आढावा संयोजकांनी घेत फलटणच्या इतिहासात सर्वात मोठा मोर्चा काढण्याचा पण केला आहे. मोर्चात घरेदारे बंद ठेवून सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले. शहरातील वातावरण मोर्चामय झाले असून, गर्दीच्या उच्चांकाकडे लक्ष लागून राहिले आहे. विविध संघटनांनी व समाजांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. राज्यात मराठा समाजाचे जिल्हावार मोर्चे निघत असताना रविवार, दि. १८ रोजी तालुका पातळीवर फलटणला मोर्चा काढण्याचा निर्णय गटतट, पक्ष विसरून एकत्र आलेल्या मराठा समाजाच्या नेतेमंडळींनी घेतला. नियोजनासाठी दररोज बैठकांचा सपाटा लावून घर ते घर पिंजून काढण्यात आले. युवक व युवतीही मोठ्या संख्येने पुढाकार घेऊ लागल्याने गेले आठ दिवस मोर्चाचीच हवा व चर्चा फलटणमध्ये सुरू आहे. मूकमोर्चात सहभागच नव्हे तर अनेकांनी तनमन धनाने मदत केल्याने मोर्चासाठी प्रत्येक गावागावांमध्ये जनजागृती, रिक्षा, जीपद्वारे प्रचार सुरू होऊन आंदोलनात घरेदारे बंद ठेवून उतरण्याचा निर्धार तालुक्यातील मराठा समाजाने घेतल्याचे दिसून आले. मुस्लीम समाज, अखिल महाराष्ट्र बेडर रामोशी समाज कृती समिती, देवांग कोष्टी समाज, फलटण बिल्डर असोसिएशन, फलटण तालुका बेरोजगार असोसिएशन यांनी पाठिंबा दिला आहे. (प्रतिनिधी)मराठा बांधवांचे गावोगावी ‘मायक्रो प्लॅनिंग’बैठकीला महिलांची संख्या लक्षणीय : लाखोंच्या संख्येने सहभाग नोंदविण्याचा निर्धार मलकापूर : मराठा क्रांती मोर्चासाठी तालुक्यातील गावागावांत मायक्रो प्लॅनिंग करून तालुक्यातून लाखोंच्या संख्येने सहभाग नोंदवण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. बैठकीस शेकडो मराठा बांधवांची उपस्थिती होती. दरम्यान, या बैठकीत वकील संघटना व वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मोर्चासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे जाहीर केले.सातारा येथे होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या तयारीसाठी कऱ्हाड तालुक्यातील मराठा बांधवांची दुसरी बैठक पार पडली. या बैठकीसाठी तालुक्यातून शेकडो बांधव उपस्थित होते. महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग दाखवला. शनिवारी झालेल्या बैठकीत मोर्चासाठी स्थापन केलेल्या तालुक्यातील समित्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. मोर्चाची व्याप्ती विचारात घेता गावागावांत मायक्रो प्लॅनिंग करण्याची गरज असल्याचे मत बहुतांश जणांनी व्यक्त केले. यावर मोर्चामध्ये शिस्त, शांतता व सर्वांनाबरोबर घेऊन जाण्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.यावेळी मराठा क्रांती मोर्चा कशासाठी, याबाबतीत अनेकांना मत मांडण्याची संधी देण्यात आली. यावेळी महिलांनी उत्स्फूर्तपणे मराठा समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत तीव्र शब्दात मते मांडली. हा मोर्चा कोणत्याही जाती धर्माविरोधात नसून मराठा समाजाच्या न्याय व हक्कासाठी आहे. मतभेद विसरून आपल्या हक्कासाठी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी सर्वानुमते करण्यात आले. प्रत्येकाने सहभाग नोंदवत प्रत्येक घरात प्रसार करून तालुक्यातून लाखोंच्या संख्येने सहभाग नोंदवण्याचा निर्धार ‘एक मराठा लाख मराठा’ची घोषणा देत केला. (प्रतिनिधी)
मराठा मोर्चाला मुस्लीम समाजाचा पाठिंबा
By admin | Published: September 17, 2016 10:30 PM