सातारा: बस स्थानकातील पाच बसेसना आग लावल्याचा आरोप असलेला वीस वर्षीय मूकबधिर मुलगा म्हणतोय, तो मी नव्हेच. मी तर एसटीतील बाकड्यावर झोपलो होते. दोन मुले बसमध्ये सिगारेट ओढत बसली होती. त्यातील एकाने सिगारेटने पडद्यांना आग लावली आणि ते पळून गेले, असा त्या मूकबधिर मुलाने पोलिसांना जबाब दिला आहे.
सातारा बस स्थानकातील शिवशाहीच्या पाच बसेसना बुधवारी सायंकाळी आग लागली होती. या आगीत पाचही बस जळून खाक झाल्या. यात दोन कोटींचे नुकसान झाले असून, ही आग एका मूकबधिर मुलाने लावली असल्याची तक्रार शिवशाहीचे मॅनेजर राजेंद्र तुपे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मूकबधिर मुलाला चाैकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांना तो काय बोलतोय, हे समजत नसल्यामुळे पोलिसांनी दुभाषकाला बोलावले. त्यांच्यामार्फत पोलिसांनी त्या मुलाची चाैकशी केली. त्यावेळी त्या मुलाने सांगितले. ‘मी बसमधील शेवटच्या बाकड्यावर झोपलो होतो. त्यावेळी त्याच बसमध्ये दोन मुले पुढे सिगारेट ओढत होती. त्यातील एकाने सिगारेट एसटीतील पडद्याला लावली. त्यामुळे आग लागली. त्यानंतर ती मुले पळून गेली. पण मी बराचवेळ तेथेच होतो. धूर निघत असल्याचे पाहून मी सुद्धा एसटीतून खाली उतरून पळू लागलो. तेव्हा लोकांनी मला पकडलं. अशा प्रकारचा जबाब त्या मूकबधिर मुलाने दिल्याने पोलीसही संभ्रमात पडले आहेत.
हा जबाब घेतल्यानंतर संबंधित मुलाला पोलिसांनी पुन्हा घरी सोडून दिले. या मुलाने अशा प्रकारे जबाब दिल्याने आता नेमकी आग कुणी लावली. असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. त्यामुळे पोलिसांनी आता सारे लक्ष सीसीटीव्ही फुटेजवर केंद्रित केले आहे. या फुटेजमधूनच एखादा पुरावा समोर येइल, अशी आशा पोलिसांना आहे.