संडे स्टोरी
सचिन काकडे
भाऊ-बहिणीचं नातं हे ‘तुझं माझं जमेना आणि तुझ्याविना करमेना’ असंच काहीसं असतं. या नात्यामध्ये छोटे-मोठे वाद-विवाद तर असतात पण त्यापेक्षाही अधिक प्रेम असतं. भाऊ-बहिणीच्या नात्याबाबत बोलावं तेवढं कमीच आहे. या दोघांमधील प्रेम वृद्धिंगत करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी भाऊ असो किंवा बहीण एकमेकांना भेटवस्तू हमखास देतात. काळ बदलला तसं भेटवस्तूही बदलत गेल्या. मात्र बहीण-भावाचं प्रेम काही कमी झालं नाही.
बहीण-भाऊ रक्षाबंधन या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. जरी भाऊ रक्षाबंधनाला जाऊ शकला नाही किंवा बहीण येऊ शकली नाही तरी भेटवस्तू देणं हे ठरलेलंच असतं. पूर्वी बहिणीला साडी, ड्रेस अथवा तिला आवडीची वस्तू घेण्यासाठी पैसे भेट म्हणून दिले जायचे. काळ बदलला तसा भेटवस्तू देण्याचा ट्रेंड बदलला. आता फॅशनेबल ज्वेलरी, मेकअप किट, फुटवेअर सोन्याचा अथवा चांदीचा एखादा दागिना अशा वस्तू भाऊरायाकडून बहिणीला दिल्या जातात. इतकेच नव्हे तर एखाद्या पर्यटनस्थळी जाण्याचे नियोजन ही भाऊरायाकडून केले जाते.
सध्या ऑनलाइनचा जमाना असल्याने आपल्याला हव्या त्या वस्तू घर बसल्या सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे भावाकडून बहिणीला ऑनलाइन भेटवस्तू पाठवून रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित केला जात आहे. बहिणीला घड्याळ, शाम्पू किट, लंच बॉक्स, सनग्लासेस, पासपोर्ट होल्डर, जिम वेअर, फिट बीट वॉच, लॅपटॉप कव्हर, कॉफी मग, नोटबूक अशा वस्तू दिल्या जात आहेत. तर बहिणीकडून भावाला लेदर जॅकेट, टी-शर्ट, डिजिटल वॉच, बिअर्ड ऑइल, कॉफी मग, ब्लूटूथ हेडफोन, पाकीट, ब्लूटूथ स्पीकर, पेन ड्राईव्ह, जिम बॅग अशा वस्तू देण्याकडे कल वाढला आहेत.
(चौकट)
या भेटवस्तूंना अधिक पसंती
सध्या कोरोना संक्रमणाचा काळ सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या रक्षाबंधनला भेटवस्तू देण्याचा ट्रेंड थोडा बदलला आहे. बहिणीसाठी स्टडी टेबल, सॅनिटायझर, पॉवर, पावर बँक, लॅपटॉप, मोबाइल, इअर फोन अशा वस्तूंना देखील मागणी वाढली आहे. कोरोना काळात बहीण सुरक्षित आणि कोरोनापासून मुक्त रहावी, असा या मागचा उद्देश आहे.
(चौकट)
‘रक्षा’ म्हणजे रक्षण ‘बंधन’ म्हणजे धागा
रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.
(चौकट)
बहीणच का ओवाळते
राखीचा दोरा हा नुसता दोराच नसून तो बहीण-भावाच्या नात्याचे प्रतीक आहे. ते एक शील, प्रेमळ, मायाच्या पवित्र्याचे रक्षण करणारे बंधन आहे. रक्षाबंधनाला बहीण भावाला ओवाळते. राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. भावाच्या मस्तकातील सद्बुद्धी जागृत व्हावी, त्याला दीर्घायुष्य, सुख, समाधान लाभावा असाच या ओवाळणी मागचा उद्देश असतो. तर भाऊ या प्रेमरूपी बंधनात स्वतःला वाहून घेऊन बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो.