सातारा : फलटण तालुक्यातील काळज येथील अपहरण झालेल्या अवघ्या दहा महिन्यांच्या चिमुकल्याच्या खुनाचे गूढ उलगडण्यास पोलिसांना यश आले असून, या चिमुकल्याचा खून त्याच्या आईवर असलेल्या एकतर्फी प्रेमातून झाला असल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली. याप्रकरणी एका युवकाला अटक करण्यात आली आहे.अभिजित रामदास लोखंडे (वय २८, रा. तडवळे, ता. फलटण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी, ओम त्रिंबक भगत या अवघ्या दहा महिन्यांच्या चिमुकल्याचे मंगळवार, दि २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता घरासमोरून त्याचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकारामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती. ओमच्या शोधासाठी पाचशेहून अधिक पोलीस कर्मचारी, ८०० ग्रामस्थ त्याचा शोध घेत होते.
सलग दोन दिवस त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान, गुरुवार, दि. १ रोजी सकाळी सातच्या सुमारास या मुलाचेच वडील घराच्या पाठीमागील बाजूस शंभर फुटांवर असणाऱ्या विहिरीवर अंघोळीसाठी गेले असता त्यांना त्यांच्याच मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. अपहरणकर्त्यांनी अखेर चिमुकल्याचा बळी घेतल्याने संपूर्ण फलटण तालुक्यात संतापाची लाट उसळली होती. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभगीय पोलीस अधिकारी अजित टिके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली.
पोलिसांनी आठ टीम तयार केल्या. ही सर्व पथके काळज, तडवळे, फलटण या आजूबाजूच्या गावांमध्ये तपासासाठी रवाना झाली. यापैकी एका पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली की, शेजारील गावातील एक युवक एकतर्फी प्रेमातून वारंवार बाळाच्या आईचा पाठलाग करून त्रास देत होता. त्याबाबत संपूर्ण माहिती गोळा करून, संशयित अभिजित लोखंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
लोणंद पोलीस ठाण्यात त्याला आणून काळज येथील बाळाच्या अपहरणाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या मुद्द्यांवर विचारपूस केली. परंतु लोखंडे हा चलाखपणे उडवाउडवीची उत्तरे देऊन तपास पथकाची वारंवार दिशाभूल करत होता.स्वत: पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी आरोपीवर प्रश्नांचा भडीमार केला. पाच तास चौकशी केल्यानंतर अखेर त्याने गुन्हा कबूल केला.