डोंगरातील गुहा आणि गुहेतील देवालय, अशी स्थळे काही ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र, पाटण तालुक्यातील येराडवाडीत प्राचीन गुहा, गुहेत शंभू महादेवाची स्वयंभू पिंड, पांडवकालीन लेणी, तसेच गुहेसमोर कोसळणारा धबधबा असे विलक्षण दृश्य पाहायला मिळते. मल्हारपेठपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण रुद्रेश्वर म्हणून ओळखले जाते. नव्वद फूट उंच अणि तीस फूट लांब असलेल्या येथील गुहेतील लेण्यांचा घेर पंचवीस फूट असून, लेण्यांची अंतर्गत रचना प्रसिद्ध अजिंठा लेण्यांसारखी आहे.
कऱ्हाडातही एक गूढ विहीर असून, या विहिरीला ‘नकट्या रावळ्याची विहीर’ म्हणून ओळखले जाते. बाराव्या शतकातील ‘शिलाहार’ राजवटीत ही विहीर बांधलेली असून, कोयना नदीपात्रापासून ७५ फूट उंचीवर आहे. ४१.५ मीटर लांबी, ३०.५ मीटर लांबीचा सोपान मार्ग व खाली ११ मीटर चौरस अशी विहिरीची रचना आहे. विहिरीत उतरण्यासाठी ८४ पायऱ्या असून, आतील बाजूस असलेल्या कमानीवर नक्षीकाम केले आहे. प्रत्येक वीस पायऱ्यांनंतर एक मोठी पायरी आहे. पायऱ्या संपताच त्याठिकाणी दोन मोठ्या दगडी स्तंभावर एक मोठी कमान आहे. या कमानीत दोन उपमार्ग आहेत. या विहिरीमुळे आजही कऱ्हाडचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होते.
पाटण तालुक्यातील वाल्मीक पठार हे वाल्मीकी ऋषींची तपोभूमी आहे. वाल्मीकी ऋषींचे मंदिर, पवनचक्क्या, थंड हवा, कंधार धबधबा, विस्तीर्ण जंगल, अनेक औषधी वनस्पती, वांग नदीचे उगमस्थान अशा अनेक ठिकाणांमुळे हे पठार निसर्गप्रेमींसाठी आकर्षण आहे.
- संजय पाटील
- चौकट
कुठे काय पाहाल..
१) कऱ्हाड :
प्रीतिसंगम घाट
कृष्णाबाई मंदिर
पी. डी. पाटील उद्यान
वसंतगड
सदाशिवगड
खोडशी प्रकल्प
टेंभू प्रकल्प
२) पाटण :
कोयना धरण
नेहरू गार्डन
फुलपाखरू उद्यान
जंगली जयगड
हेळवाकची रामघळ
येडोबा मंदिर
धारेश्वर दिवशी
मराठवाडी प्रकल्प
सडावाघापूर टेबललँड
डिंबा पॉइंट, नवजा टॉवर
- चौकट
महत्त्वाच्या ठिकाणांचे अंतर
सातारा ते कऱ्हाड : ५०
सातारा ते उंब्रजमार्गे पाटण : ६२
कऱ्हाड ते पाटण : ३०
पाटण ते कोयना : २४
कऱ्हाड ते ढेबेवाडी : २७
ढेबेवाडी ते वाल्मीकी : २५
(अंतर किलोमीटरमध्ये)
फोटो : २४संडे०१, ०२, ०३