वेळे :
सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हळद उत्पादक शेतकरी हळदीचे स्वतः पॅकिंग करून ब्रँडिंग करीत आहेत, हे खूपच अभिमानास्पद असून, लोकांच्यात बदल होऊन, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत असल्याचे पाहून समाधान वाटले. शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक केल्यास उपलब्ध पाण्यातून दुप्पट क्षेत्र ओलिताखाली येईल, यासाठी लागणारे सहकार्य नाबार्ड करेल, अशी ग्वाही नाबार्डचे चेअरमन डॉ. जी.आर. चिंताला यांनी दिली.
कवठे, ता. वाई येथील नाबार्ड पुरस्कृत पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प कवठे व वहागावच्या शुभारंभ प्रसंगी डॉ. चिंताला बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील, दत्तानाना ढमाळ, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, नाबार्डचे मुख्य सरव्यवस्थापक एल.एल. रावल, ए.सी. जेना, एम.पी. श्रीनिवासुलू, अमोल दुसे, प्रदीप पराते, जिल्हा व्यवस्थापक सुभोद अभ्यंकर, सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे, ज्ञानदीपचे संस्थापक विश्वनाथ पवार, उपाध्यक्ष एकनाथ पवार, सरपंच श्रीकांत वीर, उपसरपंच गोरख चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. चिंताला पुढे म्हणाले, ‘कवठे गावातील सर्वांनी एकत्र येऊन श्रमदान करून सुरू केलेल्या जलसंधारण व पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पातून गाव येत्या दोन वर्षांत शेती क्षेत्रात क्रांती करून एक स्मार्ट व्हिलेज म्हणून नावारूपास येईल. त्यासाठी तुम्हाला जे करता येईल, ते त्याचा आराखडा बनवून करा. त्यासाठी लागणारी सर्व ती मदत नाबार्ड करेल. नाबार्ड गावांच्या प्रगतीसाठी तसेच स्वतःहून पुढे येऊन काम करणाऱ्यांसाठी कायम पुढे होऊन साहाय्य करते. नाबार्डकडे निधी भरपूर आहे, त्यासाठी तुम्ही सर्वांनी काम करा. या परिसरात हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कोरोनासारख्या महामारीत सर्व रोगांवर उपयोगी हळद कुटुंबातील सर्वांसाठीच प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी लाभदायक ठरली आहे.’
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल डेरे, भूषण डेरे यांनी केले. उपस्थितांचे स्वागत संदीप डेरे, संदीप पोळ, शिवाजी करपे, सचिन पोळ यांनी तर ज्ञानेश्वरी पोळ हिने आभार मानले. (वा.प्र)
फोटो- कवठे (ता. वाई) नाबार्ड पुरस्कृत पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पाचा शुभारंभ डॉ. चिंताला यांच्या हस्ते झाला. त्यावेळी संचालक नितीन पाटील, डॉ. राजेंद्र सरकाळे, एल.एल. रावल, सरपंच श्रीकांत वीर व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो नेम : १६कवठे