वडूज : शहरातील बाजार पटांगणातील अडीच वर्षांपूर्वीची वापरात असलेली जुनी मुतारी पाडून नवीन स्वच्छतागृह बांधण्याचा नगरपंचायतीचा घाट अंगलट आल्याचे स्पष्ट होत आहे. प्रामाणिकपणे नगर पंचायत कर भरणाऱ्या गाळेधारकांना, बाजारातील शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना लघुशंकेसाठी एक किलोमीटरची नाहक पायपीट करावी लागत आहे. जुनी वापरात असलेली पाडलेली स्वच्छतागृहे बांधकामाला नगरपंचायतीला मुहूर्त सापडत नाही की काय? या चर्चेला उधाण आले आहे.
या परिसरात शहरातील दैनंदिन मंडई व आठवडे बाजार तालुक्यात मोठ्या स्वरूपात होत असतो. कोरोना महामारीच्या आर्थिक संकटानंतर शासनाने शेतकरी व व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला. शासनाने व स्थानिक प्रशासनाने आखून दिलेल्या नियमावलींचे पालन करत मंडई सध्या इतर ठिकाणी भरली जात आहे. नगरपंचायतीस मंडईद्वारे कररूपी लाखोंचे उत्पन्न मिळत असते. मात्र, त्या पटीत कोणत्याच सोयीसुविधा मिळत नसल्याने मोठी खंत व्यक्त होत आहे. ना पिण्याच्या पाण्याची सोय, ना सुरक्षित बैठक व्यवस्था, ना शौचालय, ना स्वच्छतागृह. या अवस्थेत गाळाधारक, शेतकरी, महिला शेतकरी व व्यापारी नगरपंचायत प्रशासनाचा अधिभार सोसत आहेत. कित्येक वर्षे या बाजार पटांगणात तालुक्याचा मुख्य बाजार भरत असून, कररूपी लाखो रुपये मिळूनदेखील संबंधित प्रशासन या गरजासंदर्भात टाळाटाळ करीत आहे. आरोग्याशी निगडित असलेल्या या ज्वलंत व गंभीर प्रश्नाबाबत नगरपंचायत प्रशासन गांधारीच्या भूमिकेत का वावरत आहे, याबाबत न उलगडणारे कोडे आ वासून उभे ठाकले आहे.
सुस्थितीत असलेल्या बांधकामाचे गत काही वर्षांपूर्वी नूतन स्वच्छतागृह बांधण्यासाठी जुने बांधकाम पाडलेली स्त्री-पुरुष स्वच्छतागृह यामागचे गौडबंगाल सर्वसामान्यांना समजलेच नाही. कोणाची मतरूपी मर्जी राखण्यासाठी हा बांधकाम पाडण्याचा घाट तर नव्हे ना, अशाच चर्चेला सध्या उधाण आले आहे. पाडलेली स्वच्छतागृह बांधकाम लांबणीवर टाकण्याचा नगरपंचायतीचा घाट याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. संबंधित प्रशासनाने सोयीसुविधा उपलब्ध करून मगच कररूपी पावत्या शेतकरी व व्यापाऱ्यांना द्याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
प्रतिक्रिया-
सध्या या परिसरात गटार व्यवस्थेचे काम सुरू असल्याने स्वच्छतागृहासाठी खोदलेल्या खड्ड्यात तात्पुरती माती टाकली आहे. मात्र, गटारचे काम झाल्यानंतर या स्वच्छतागृहाचे काम सुरू करणार आहे.
-माधव खांडेकर, मुख्याधिकारी, वडूज नगरपंचायत
फोटो ..०२वडूज
वडूजमध्ये गत अडीच वर्षांपासून खोदलेला खड्डा जैसे थे असून यामध्ये माती टाकली आहे. (छाया : शेखर जाधव)
--------------------------
-------