खंडाळा : स्त्री शिक्षणाच्या आद्यजनक व सामाजिक क्रांतीच्या प्रणेत्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला देण्यात यावे, असा प्रस्ताव राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला होता. मात्र, तो मंजूर करण्यात आला नाही, त्यामुळे बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रातील युगपुरुष, समाजसुधारकांची कदर राज्य शासनाला नाही, अशा भावना व्यक्त करीत सावित्रीबार्इंचे जन्मगाव नायगाव, ता. खंडाळा येथे ग्रामस्थ व महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. ‘मागू नका, संघर्षातून मिळवा, तयार राहा,’ असा नारा दिल्याने या प्रकरणातून राज्यात मोठा संघर्ष निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले.नायगाव, ता. खंडाळा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये ग्रामस्थ महिला व अखिल भारतीय समता परिषद खंडाळा तालुका यांच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली. यावेळी समता परिषदेचे पश्चिम भाग अध्यक्ष विनोद क्षीरसागर, तालुकाध्यक्ष राजेंद्र नेवसे, माजी सभापती शुभांगी नेवसे, माजी पंचायत समिती सदस्य अॅड. सुनील नेवसे, उपाध्यक्ष महेंद्र माने, प्रकाश दगडे, सरपंच धनंजय नेवसे, उपसरपंच मनोज नेवसे यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.विनोद क्षीरसागर म्हणाले, ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजासाठी अखंड काम केले. समाजसुधारकांचे नाव घेऊन राजकारणी मते मागतात. राज्य करतात; परंतु ज्यांच्यामुळे आपण आहोत, याचा त्यांना विसर पडला आहे. त्यांचे नाव विद्यापीठास देण्यासाठी विरोध होतो, ही बाब खेदजनक आहे. निवडणुकीच्या तोंडावर शासनाने अनेक निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. मग पुणे विद्यापीठाला सिनेटमध्ये नामांतराचा प्रस्ताव मंजूर असताना राज्य शासनाने यासाठी टाळाटाळ करावी, हे महाराष्ट्रातील जनतेला रुचणारे नाही. त्यांचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी सरकारला भाग पाडले पाहिजे, मग त्यासाठी कितीही मोठा संघर्ष उभारावा लागला, रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल. या समाजसुधारकांनी आपले आयुष्य लोक कल्याणासाठी झिजवले. आता उठाव करण्याची वेळ आपली आहे, त्यासाठी या संघर्षमय चळवळीत सामील व्हा, असे आवाहनही त्यांनी केले. राजेंद्र नेवसे म्हणाले, ‘सावित्रीबार्इंमुळे नायगावची भूमी पवित्र झाली. पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. त्यालाच ज्ञानज्योतींचे नाव देण्यात यावे, ही महाराष्ट्रातील जनतेची मागणी होती. मात्र, मंत्रिमंडळ बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री छगनराव भुजबळ यांनी हा प्रस्ताव मांडला. त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही, हा राज्याचा इतिहास आहे. राज्य शासनाला जाग आणण्यासाठी जन्मभूमीतून चळवळीची ही मशाल पेटवली आहे. आता माघार घेणे नाही. समता परिषदेच्या वतीने राज्यभर मोठा लढा उभा करू,’यावेळी शुभांगी नेवसे, अॅड. सुनील नेवसे यांचीही भाषणे झाली. या लढ्यात मोठ्या संख्येने उतरण्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला. समता परिषदेच्या वतीने जिल्हास्तरावर बैठक घेऊन यापुढील संघर्षाची दिशा ठरविण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. सरपंच धनंजय नेवसे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
नामांतरासाठी नायगावात उठाव
By admin | Published: July 05, 2014 12:44 AM