सातारा : ग्रामस्थांमध्ये एकी असेल तर अशक्य कामेही शक्य होऊन जातात. त्यामुळे गावाचा विकास होतोच त्याचबरोबर हाच आदर्श इतरांसमोरही राहतो. अशाचप्रकारे माण तालुक्यातील बनगरवाडी गावाने एकीमुळे इतरांपुढे आदर्श ठेवला आहे. ओढ्यावरील नालाबांधाचे रुपांतर पाझर तलाव्यात केले असून यामुळे अडीच कोटी लिटर पाणीसाठा होणार आहे. तर दिडशे एकर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे.
माण तालुका म्हटला की समोर येतो तो दुष्काळ आणि पाण्याचे दुर्भिक्ष. सततची ही परिस्थिती आहे. मात्र, अलीकडील काहीकाळात यामध्ये बदल होत आहे. विकासासाठी गावे एक होऊ लागली आहेत. शासनाच्या मदतीशिवायही अनेक गावांनी लोकवर्गणी व श्रमदानातून मोठी कामे केली आहेत.
तालुक्यातील बनगरवाडी (वरकुटे मलवडी) गावाने एकत्र येत पाणीसाठ्याची अनेक कामे केली आहेत. यामधील प्रमुख काम म्हणजे नालाबांधाचे पाझर तलावत केलेले रुपांतर. येथील बामणकी ओढ्यावर गावाशेजारीच पूर्वी नालाबांध होता.
पावसाळ्यात सुमारे २०० एकर क्षेत्रावरून या नालाबांधात पाणी येते. मात्र, नालाबांधाला गळती असल्याने पाणी वाहून जायचे. त्यामुळे या नालाबांधाचा फायदा होत नव्हता. त्यातच माण तालुक्यात पाणलोट, वॉटर कप स्पर्धेमुळे गावागावांत पाणी चळवळ सुरू झाली. यातूनच आयकर विभागातील सह आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ एकत्र आले.
गावासाठी पाणी चळवळ राबवायचा निर्णय घेऊन एकी केली. त्यातूनच नालाबांधाचा पाझर तलाव होऊ लागला आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
ग्रामस्थ पाझर तलावासाठी रोज श्रमदान करत आहेत. सकाळी साडे आठ ते दहा वाजेपर्यंत ग्रामस्थ काम करतात. या पाझर तलावाच्या भिंतीची लांबी सुमारे १५० मिटर इतकी झाली आहे. लोकांनी स्वत: काम केल्याने काम दर्जेदार झाले असून याचा फायदा पाणीसाठा झाल्यानंतरच समोर येणार आहे. शासनाच्या मदतीशिवाय हे काम झाले आहे. यामागे गावाची एकीच कारणीभूत ठरली आहे.
पाझर तलावाची स्थिती...
भिंतींची लांबी १५० मिटर१० फूट उंचीचा तसेच पाठीमागे २५० मिटरपर्यंत पाणीसाठा होणार १५० एकर क्षेत्र ओलिताखाली येणार परिसरातील ६० विहिरींना फायदा दहा लाखांच्या शासकीय अंदाजाचे काम फक्त ३ लाखांत चहा, नाष्ट्याची सोय...दररोज सकाळी ग्रामस्थ श्रमदानासाठी येतात. त्यांच्यासाठी अनेकजण स्वइच्छेने चहा, नाष्ट्यांची सोय करतात. या कामाची पाहणी आसपासच्या गावांतील ग्रामस्थांनीही केली आहे. शासकीय अधिकाºयांनीही या कामाला भेट दिली आहे.