शिरवळ : सिरियल किलर संतोष पोळ हा पोलिसांना दररोज नवनवीन माहिती देत असून, आता तर त्याने नथमल भंडारी यांच्या खुनाची माहिती सलमा शेखला होती. सलमा या संदर्भात कोठे तरी वाच्यता करेल, या भीतीपोटी सलमाचाही त्याने बळी घेतल्याचे तपासात पुढे येत आहे. वाई पोलिस ठाण्यात शनिवारी बंद खोलीत तासन्तास संतोषची चौकशी करण्यात आली. तर दुसऱ्या बाजूला एका खोलीत ज्योती मांढरे ही निर्धास्त बसलेली दिसत होती. नथमल भंडारीवर उपचार करत असल्याचे व तो माझ्या संपर्कात असल्याचे परिचारिका सलमा शेखला माहीत होते. नथमल भंडारी हे बेपत्ता झाल्यानंतर सलमा शेख ही संतोष पोळला वारंवार विचारणा करत होती. नथमल भंडारीबाबत ती कोणालाही सांगू शकते, अशी शक्यता गृहित धरून सलमा शेखला संपविण्याचे ठरवले, असे त्याने पोलिसांना सांगितले आहे. सलमा शेखला विविध आमिष दाखवत तसेच संतोष पोळने ‘माझ्याकडे पुणे येथील एक पार्टी आहे, जे सोने डबल करून देते, तुलाही सोने डबल करून देतो,’ असे सोने डबल करण्याचे आमिष दाखवले. यावेळी सलमा शेख हिने ‘माझ्याकडे एवढे सोने नाही,’ असे सांगताच संतोष पोळने रुग्णालयातील दुसऱ्या परिचारिकांकडून सोने आणण्यासाठी सांगितले. यावेळी सलमा शेखने ‘सोने आणल्यानंतर पुणे येथे जाऊ या,’ असे सांगत सलमा शेखला खोटे सांगत दुचाकीवरून धोम येथील पोल्ट्री फार्मवर घेऊन आला. यावेळी सलमा शेख ही बसलेली असताना संतोषने पाठीमागून लोखंडी हत्याराने सलमा शेख हिच्यावर वार केला. त्यानंतर सलमाला इंजेक्शन देत तिचा काटा काढून पोल्ट्री फार्ममध्ये पुरला. (प्रतिनिधी) विश्वास न ठेवता आणखी चौकशी ! दरम्यान, संतोष पोळने दिलेली माहितीबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, प्रत्येक बाबींबाबत कटाक्षाने पाहिले जात आहे. सलमा शेख हिच्याबाबतीत संतोष पोळने दिलेल्या माहितीची खातरजमा करण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे. यावेळी सलमाच्या खूनप्रकरणी संतोष पोळला अटक केल्यानंतर न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने गुरुवार, दि. १ पर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
नथमलचा खून पचविण्यासाठी सलमाला संपविले!
By admin | Published: August 28, 2016 12:06 AM