Video - अमोल कोल्हेंचं भाषण सुरू असतानाच 'नमाज पठण' सुरू झालं, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 02:03 PM2019-08-29T14:03:19+5:302019-08-29T14:59:14+5:30
उंब्रज येथील सभेत डॉ. अमोल कोल्हे सरकारवर टीका करत होते.
सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा सुरू असून अकराव्यादिवशी ही यात्रा सातारा जिल्ह्यात पोहोचली आहे. खासदार उदयनराजे भोसलेंच्या सातारा जिल्ह्यात खासदार अमोल कोल्हे सरकारवर टीका करत होते. जिल्ह्यातील उंब्रज येथे कोल्हेंची गर्जना सुरू होती. समोर जमलेल्या जनसमुदायाला संबोधित करत असताना दुपारी 1.30 वाजता तेथील मशिदीमध्ये नमाज पठण सुरू झाले.
उंब्रज येथील सभेत डॉ. अमोल कोल्हे सरकारवर टीका करत होते. राज्यातील शेतकरी आणि तरुणांचे प्रश्न उपस्थित जनतेला सांगत होते. सरकार किती निष्क्रीय आहे, हेही आपल्या सभेतून ते लोकांना सांगत होते. तितक्यात, अल्लाह हू अकबर अल्लाह.... असा आवाज ऐकू आला. नमाज पठणाची हा ध्वनी ऐकताच अमोल कोल्हे आपल्या जागेवर स्तब्ध उभे राहिले. सभेतील आपले भाषण बंद केले आणि नमाज पठण पूर्ण होईपर्यंत शांत उभे राहिले. अमोल कोल्हेंच्या या कृत्याचे उपस्थित नागरिकांनीही कौतुक केले. नमाजाचा ध्वनी संपताच लोकांनी टाळ्या वाजवून अमोल कोल्हेंच्या समयसूचकतेला आणि कृत्याला दाद दिली.
नमाज पठण संपल्यानंतर कोल्हे यांनी पुन्हा आपल्या भाषणाला सुरूवात केली. तत्पूर्वी, ईश्वर सर्वश्रेष्ठ आहे, कुणाला मंदीरमध्ये दिसतो, कुणाला मस्जिदमध्ये दिसतो तर कुणाला भाकरीमध्ये दिसतो, असे म्हणत नमाज पठण करणाऱ्या मुस्लीम बांधवांच्या श्रद्धात्मक भावनेचा आपल्या शब्दातून आदर व्यक्त केला. दरम्यान, येथील सभेतही कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तसेच, भाजपा सरकार भ्रष्टाचारी असून मुख्यमंत्री भ्रष्टाचारी मंत्र्यांना क्लीन चीट देऊन पाठिशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पाहा व्हिडीओ -