सातारा : सातारा शहरातील मुख्य रस्त्यासह गल्ली-बोळातील रस्ते चकाचक झाले असले तरी पालिकेच्या समोरच असलेल्या पोलीस वसाहतीचा रस्ता अजूनही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या ठिकाणच्या खड्ड्यात वाहन अडकले तर नागरिक पालिकेलाच जबाबदार धरत आहेत. वास्तविक हा रस्ता बांधकाम विभागाच्या हद्दीतील असूनदेखील खड्ड्यासाठी पालिकेला नावे ठेवण्यात येत असल्याचा प्रकार येथे पाहायला मिळत आहे. नगरपरिषदेच्या मुख्य द्वारासमोरच पोलीस वसाहत आहे. आंबेडकर स्मारकापासून शहर पोलीस स्टेशनकडे जाणारा हा रस्ता मागील दोन ते तीन वर्षांपासून डांबरीकरण न झाल्याने जगोजागी खड्डे पडले आहेत. यामुळे या रस्त्यावरून वाहन चालविताना खड्डे चुकविण्याचे जणू आव्हानच वाहनधारकाला पेलावे लागते. शहरातील अगदी काही ठिकाणी १० ते २० वर्षांपूर्वीचे रस्ते प्रथमच डांबरीकरण केले असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु पालिकेच्या समोरील खड्डे पालिकेला दिसत का नाही, असा सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे. पालिका प्रशासन व अधिकाऱ्यांना वाहनधारकांचे बोलणे खावे लागत आहे. याचा जास्त खुलासा केल्यानंतर वाहनधारकांच्या लक्षात येते की, हा रस्ता बांधकाम विभागाच्या हद्दीत येत असून, या रस्त्याची जबाबदारीही बांधकाम विभागाची आहे. दरम्यान, पोलीस वस्तीतील दुरुस्तीही सर्व जबाबदारी ही बांधकाम विभागाची आहे. या वसाहतीच्या प्रत्येक निवासस्थानाकडून दुरुस्तीसाठी पगारातून रक्कम कपात केली जाते. तरीदेखील बांधकाम विभाग या वसाहतीकडे किमान मूलभूत गरजेकडे दुर्लक्ष करीत आहे. या वसाहतीतील रस्ते कमी आणि खड्डे जास्त, अशी अवस्था झाली असून, रस्त्याची मागणी करून देखील याकडे दुर्लक्ष होत आहे. वेळोवेळी पोलीसच मातीचा भराव टाकून रस्ता दुरुस्त करत आहेत. साताऱ्यातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ऐकेरी वाहतूक सुरू केली आहे. तेव्हापासून या रस्त्यावर वर्दळ वाढली असून, बहुतांशी शहरातील नागरिक याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या सकाळी आणि संध्याकाळी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असल्याचे पहायला मिळते. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी पोलीस वसाहती बरोबर शहरातील नागरिकांनीही केली आहे. (प्रतिनिधी) चारचाकी वाहनांचे होतेय नुकसान ४एकेरी वाहतुकीच्या वेळी अनेकदा जवळचा रस्ता म्हणून या रस्त्याचा आधार घेतला होता. मात्र, चारचाकी वाहनांना या रस्त्याचा मोठा फटका बसत आहे. रस्त्यात असणारे खड्डे आणि स्पीडब्रेकर यामुळे चारचाकी वाहन नियंत्रणात आणणे चालकाल कसरतीचे वाटत असल्याचे चित्र दिसते.
‘बांधकाम’च्या खड्ड्याला पालिकेचे नाव
By admin | Published: January 13, 2016 10:08 PM